• Fri. Jun 5th, 2026

“एससी उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाजाचे रणशिंग; 15 जूनच्या लाँग मार्चसाठी अहिल्यानगर सज्ज”

ByMirror

Jun 4, 2026

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील बैठकीत नियोजन; संविधान रक्षणासाठी आरपारच्या संघर्षाचा इशारा


“उपवर्गीकरणाच्या विरोधात एकजुटीचा निर्धार; “जातीय फूट पाडण्याचा डाव हाणून पाडण्याचा इशारा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी बीड येथून 10 जून रोजी सुरू होणारा राज्यव्यापी लाँग मार्च 15 जून रोजी अहिल्यानगर शहरात दाखल होणार असून, या लाँग मार्चचे भव्य स्वागत करण्यासाठी आणि समाजबांधवांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग सुनिश्‍चित करण्यासाठी शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.


टिळक रोड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे विजय भांबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस एन. एम. पवळे, प्रा. निवृत्ती आरु, संजय कांबळे, राजीव साळवे, बुद्धानंद धांडोरे, महेंद्र मोहिते, राजेंद्र करंदीकर, यशराज शिंदे, अविनाश भोसले, विवेक भिंगारदिवे, कृपाल भिंगारदिवे, संदीप वाघमारे, अमरराम निरभवणे, अनिल इंगळे, शेखर पंचमुख, विजय गायकवाड, शिवाजी भोसले, विलास साठे, रावसाहेब कानडे, बाळासाहेब पातारे, सूरज बोरुडे, प्रा. एल. बी. जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


बैठकीत लाँग मार्चचे नियोजन, स्वागत सोहळ्याची रूपरेषा, जनजागृती अभियान तसेच विविध समित्यांची स्थापना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मार्च शहरात दाखल होताना मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी व्हावेत यासाठी प्रत्येक भागात संपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ उपस्थिती वाढविण्याऐवजी अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाला विरोध का केला जात आहे, याबाबतही जनतेमध्ये व्यापक जनजागृती केली जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.


स्वागत सोहळ्याचे नेतृत्व जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते करणार असून समता सैनिक दलालाही या आंदोलनात सहभागी करून घेण्यात येणार आहे. शहरातील विविध सामाजिक संघटना, युवक आणि महिला यांनाही या लढ्यात सहभागी करून घेण्यावर भर देण्यात आला. बैठकीत बोलताना उपस्थितांनी अनुसूचित जातींमधील बहुतांश समाजघटक उपवर्गीकरणाच्या विरोधात असल्याचा दावा केला. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. मातंग समाजासह सर्व घटकांपर्यंत जाऊन या विषयाची वस्तुस्थिती पोहोचविण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


एन.एम. पवळे म्हणाले की, अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा प्रश्‍न हा केवळ एका समाजाचा प्रश्‍न नाही, तर तो संविधानिक हक्क आणि सामाजिक न्यायाशी संबंधित विषय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत राहून समाजाला एकत्र ठेवण्याचे काम आपण केले पाहिजे. उपवर्गीकरणाच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. बीड ते मुंबई या राज्यव्यापी लाँग मार्चमध्ये अहिल्यानगर जिल्हा मोठ्या ताकदीने सहभागी होईल. प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीत जाऊन जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.


विजय भांबळ म्हणाले की, लाँग मार्च हा सामाजिक न्यायाच्या लढ्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. या स्वागत सोहळ्याचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धतीने केले जाईल. समाजातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व संघटनांनी या आंदोलनात सहभागी व्हावे. हा केवळ स्वागताचा कार्यक्रम नसून संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी एकत्र येण्याचा संदेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


संजय कांबळे यांनी सांगितले की, उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांपर्यंत सत्य माहिती पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. जनजागृतीशिवाय कोणतीही चळवळ यशस्वी होत नाही. आपण संविधान, समता आणि बंधुतेच्या मूल्यांवर विश्‍वास ठेवतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या जातीय तेढीला बळी न पडता सर्व समाजघटकांना सोबत घेऊन ही लढाई लढावी लागेल. 15 जूनचा लाँग मार्च हा समाजाच्या एकजुटीचे आणि संघर्षशीलतेचे प्रतीक ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


कार्यकर्त्यांनी संविधान आणि सामाजिक एकात्मतेच्या रक्षणासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. आंदोलन मोडून काढण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास पँथरची भूमिका घेण्याचा, इशाराही यावेळी देण्यात आला. उपस्थितांनी ही लढाई सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि समाजातील ऐक्य टिकविण्यासाठी असल्याचे सांगितले. 15 जून रोजी सायंकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेत राज्यभरातील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच लाँग मार्च सुपाच्या दिशेने रवाना होत असतानाही मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.


बैठकीच्या शेवटी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधानविरोधी असलेल्या जातीय उपवर्गीकरणाला विरोध दर्शविण्यात आला. तसेच समाजातील सर्व घटकांनी एकत्र राहून सामाजिक न्याय आणि संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला.



रविवारी 7 जूनला जिल्हाभरातील आंबेडकरी कार्यकर्त्यांची निर्णायक बैठक
15 जून रोजी अहिल्यानगरात येणाऱ्या राज्यव्यापी लाँग मार्चच्या स्वागतासाठी आणि उपवर्गीकरणाविरोधातील जनआंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी रविवार, दि. 7 जून रोजी जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लाँग मार्चच्या स्वागताचे नियोजन, जनजागृती मोहीम, विविध समित्यांची स्थापना आणि जिल्ह्यातील सहभाग वाढविण्याबाबत निर्णय घेतले जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. विलास साठे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *