देहरादून येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत चमक दाखविण्याची संधी; अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब
पुण्यातील निवड चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगरच्या ऐम स्पोर्ट्स अकॅडमीच्या 12 खेळाडूंची राष्ट्रीय आइस हॉकी अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली असून, या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे व बाळासाहेब खोमणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राचे आणि अहिल्यानगरचे नाव उंचावावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
अकॅडमीचे प्रशिक्षक शुभम करपे आणि प्रमोद डोंगरे यांनीही खेळाडूंना शुभेच्छा देताना त्यांच्या तयारीबाबत समाधान व्यक्त केले. गेल्या काही वर्षांपासून आइस हॉकी आणि आइस स्केटिंग या खेळांच्या प्रसारासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. आइस हॉकी असोसिएशन महाराष्ट्रचे सचिव सूरज पवार यांनीही निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांनी खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत महाराष्ट्र संघ उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला.
राष्ट्रीय आइस हॉकी अजिंक्यपद स्पर्धा 11 जून ते 8 जुलै 2026 या कालावधीत देहरादून येथे होणार आहे. देशभरातील विविध राज्यांतील अव्वल खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून, महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने निवड झालेल्या खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पुणे येथील पी-52 आइस स्केटिंग अरेना येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय निवड चाचण्यांमध्ये ऐम स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, वेग, तांत्रिक प्राविण्य आणि संघभावनेचे प्रदर्शन करत निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या सातत्यपूर्ण सरावाचे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे हे यश मानले जात आहे.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये अंडर-12 मुलांच्या गटातून राजवीर जगताप याची निवड झाली आहे. अंडर-12 मुलींच्या गटातून मतीशा सोनवणे, अर्फा खान आणि तनया क्यादर यांनी महाराष्ट्र संघात स्थान मिळवले आहे. अंडर-15 मुलांच्या गटातून भावेश वाघ याची निवड झाली असून अंडर-18 मुलांच्या गटातून ईशांत गर्जे, अर्श मुलाणी आणि आयुष पगारे यांना संधी मिळाली आहे.
वरिष्ठ पुरुष गटात वेदांत गर्जे, कार्तिक मिश्रा, आदित्य मरकड यांची निवड झाली असून, वरिष्ठ महिला गटात अभिजिता जगताप हिने महाराष्ट्र संघात स्थान पटकावले आहे. विविध वयोगटांमधून एकाच अकॅडमीच्या 12 खेळाडूंची झालेली निवड ही अभिमानास्पद ठरली आहे.
–
अहिल्यानगरमध्ये पारंपरिक खेळांसोबतच आइस हॉकीसारख्या आधुनिक आणि आव्हानात्मक खेळांबद्दल वाढणारी आवड आणि ऐम स्पोर्ट्स अकॅडमीसारख्या संस्थांचे योगदान यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळत आहे. या निवडीमुळे भविष्यात आणखी खेळाडूंना प्रेरणा मिळणार असून आइस हॉकी क्षेत्रात अहिल्यानगरचे नाव देशभरात अधिक ठळकपणे झळकण्याची अपेक्षा आहे. -शुभम करपे (प्रशिक्षक)
