• Wed. Jun 3rd, 2026

निमगाव वाघात एस.टी. प्रवास सवलतींसाठी स्मार्ट कार्ड नोंदणी

ByMirror

Jun 2, 2026

एकता फाऊंडेशनच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद; ज्येष्ठ नागरिक व महिलांनी घेतला लाभ


ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध सवलती आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम -अतुल फलके

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाऊंडेशनच्या वतीने ग्रामस्थांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाच्या प्रवासासाठी आवश्‍यक असलेल्या स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विविध घटकांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या नवनाथ मंदिराच्या सभामंडपात हे शिबिर पार पडले. ग्रामीण भागातील नागरिकांना एसटीच्या योजनांचा लाभ सहजपणे मिळावा आणि प्रवासासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दूरवर जावे लागू नये, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


शिबिरादरम्यान महिलांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली. या कार्डच्या माध्यमातून महिलांना एस.टी. प्रवासात 50 टक्के सवलतीचा लाभ मिळणार असून ज्येष्ठ महिला व पुरुषांनाही अर्ध्या तिकिटाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच वयोवृद्ध नागरिकांना शासनाच्या धोरणानुसार मोफत प्रवासाचा लाभ घेण्यासाठीही हे स्मार्ट कार्ड उपयुक्त ठरणार आहे.


या प्रसंगी निमगाव वाघा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन तथा एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, बाबासाहेब जगदाळे, भाऊसाहेब (पिंटू) जाधव, अजय ठाणगे, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, सुधीर येणारे, सुनील कापसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अतुल फलके म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध सवलती आणि सुविधा सहज उपलब्ध करून देण्यासाठी एकता फाऊंडेशनच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, हा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. अनेक वेळा आवश्‍यक कागदपत्रे, माहितीचा अभाव किंवा प्रवासाची अडचण यामुळे नागरिकांना या सुविधांचा लाभ घेता येत नाही. हीच अडचण दूर करण्यासाठी एकता फाऊंडेशनने हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.


स्मार्ट कार्ड हे केवळ एक कार्ड नसून नागरिकांच्या आर्थिक बचतीचे आणि सुलभ प्रवासाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. महिलांना अर्ध्या तिकिटाची सुविधा, ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलती आणि वयोवृद्धांना मोफत प्रवासाचा लाभ मिळण्यासाठी हे कार्ड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. निमगाव वाघा विविध कार्यकारी सेवा सोसायटी, ग्रामपंचायत तसेच सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *