शहरात तिसरी धम्म परिषद उत्साहात
पंचशील ध्वजारोहण, सुत्तपठण, धम्म मार्गदर्शन आणि धम्मदीक्षा सोहळ्याने वातावरण धम्ममय
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तथागत बुद्धिस्ट सोसायटी (भारत) यांच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेली तिसरी धम्म परिषद उत्साहात पार पडली. त्याग, समर्पण आणि संघर्षाचे प्रतीक असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याला बौद्ध अनुयायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
न्यू टिळक रोड, सक्कर चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात दिवसभर विविध कार्यक्रमांनी हा सोहळा रंगला. धम्म परिषदेची सुरुवात पंचशील ध्वजारोहण आणि सुत्तपठणाने करण्यात आली. त्यानंतर माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी सुनिल साळवे, विजय भांबळ, एन.एम. पवळे, विलास साठे, एल.बी. जाधव, सुशांत म्हस्के, अमित काळे, प्रतिक बारसे, प्रविण चाबुकस्वार, संध्याताई मेढे, आनिता आंग्रे, आरती बडेकर, अविनाश कांबळे, अविनाश भोसले, अक्षय भिंगारदिवे, विवेक भिंगारदिवे, शेखर पंचमुख, हर्षल कांबळे, संदिप वाघमारे, शांताराम बनसोडे, जयराम आंग्रे, संतोष गायकवाड, रमेश वाघमारे, रमेश पगारे, संजय शिंदे, विजय गायकवाड, हिरा पाडळे, शाम वाघचौरे, रोहित (बंडु) आव्हाड, रविंद्र घोसाळे, विश्वास गायकवाड, श्रीकांत देठे, विजयकुमार ठोंबे, सिंध्दात कांबळे, प्रमोद शिंदे, सिध्दार्थ भिंगारदिवे, दिपक गायकवाड आदींसह पूज्य भन्ते भिक्खू, समाजबांधव, माता-भगिनी आणि बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागमय जीवनकार्याचा उल्लेख करताना सांगितले की, “माता रमाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीर साथ दिली. त्याग, समर्पण आणि प्रेरणेचे प्रतीक असलेल्या माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित धम्म परिषद आणि धम्मदीक्षा सोहळ्याच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या माध्यमातून बुद्ध धम्माची शिकवण समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे.”
संध्याकाळी 4 वाजता अविनाश कांबळे प्रस्तुत बुद्ध-भीम गीतांचा “कादंबरी आर्केस्ट्रा” हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमातून बौद्ध आणि आंबेडकरी विचारांचा जागर करण्यात आला. विविध गीतांमधून समता, बंधुता, सामाजिक परिवर्तन आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.
विशेष धम्म मार्गदर्शन सत्रात विविध भागांतून आलेल्या भन्ते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यामध्ये पुज्य भन्ते सचित्तबोधी (पुणे), भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय महासचिव पूज्य भिक्खु डॉ. सुमेधबोधी (मुंबई), परमानंद विपश्यनाचार्य (बुद्ध गया), भारद्वाज (येवला मुक्ती भूमी), आनंद मित्त (पुणे), धम्मपाल (अहिल्यानगर), शासन मैत्रीय (सुरत), चंद्रबोधी (हरियाणा), सागरबोधी (जालना), महानंदा (परभणी), सुमेधबोधी (नांदेड), संघरक्षित (आंबळनेर), भिक्खुनी शासन उपचला (हिंगोली) यांचा समावेश होता. या मार्गदर्शन सत्रात बुद्ध धम्म, मानवता, समता, करुणा आणि सामाजिक परिवर्तन या विषयांवर सखोल विचार मांडण्यात आले.
पुज्य भन्ते परमानंद विपश्यनाचार्य म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माच्या माध्यमातून मानवतेचा, समतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग समाजाला दिला. समाजात परिवर्तन घडवायचे असेल तर शिक्षण, संघटन आणि धम्माचा स्वीकार आवश्यक आहे.”
भन्ते सचित्तबोधी म्हणाले की, “बुद्ध धम्म हा केवळ धर्म नसून जीवन जगण्याची एक वैज्ञानिक आणि मानवतावादी पद्धत आहे. समाजात द्वेष, अन्याय आणि विषमता दूर करण्यासाठी करुणा आणि मैत्रीचा मार्ग स्वीकारणे गरजेचे आहे.”
धम्म परिषदेच्या निमित्ताने समाजकार्य, महिला सक्षमीकरण आणि आंबेडकरी विचारांच्या प्रसारासाठी योगदान देणाऱ्या मालतीताई मारुती साठे, डॉ.प्रा. रत्ना संजय वाघमारे, डॉ. सिताताई विठ्ठलराव भिंगारदिवे, सुनिताताई माधवराव गायकवाड, ॲड. सुरेखा प्रदीपकुमार चौदंते व गौतमीताई सुरेश भिंगारदिवे या सहा महिलांना “त्यागमूर्ती माता रमाई गौरव पुरस्कार” उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
रात्री बौद्ध धम्माचे अभ्यासक संजय कांबळे यांच्या हस्ते धम्मदीक्षा सोहळा पार पडला. यावेळी अनेक उपासकांनी बौद्ध धम्माची दीक्षा स्वीकारली. धम्मदीक्षा स्वीकारलेल्या उपासकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. संपूर्ण परिसर बुद्धमय वातावरणाने भारावून गेला होता. ही धम्म परिषद यशस्वी होण्यासाठी नीलक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट, रेल्वे स्टेशन आंबेडकरी समाज, समस्त स्वाभिमानी आंबेडकर समाज तसेच सर्व बौद्ध बांधव-भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
