नाशिक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते होणार गौरव
शिक्षण व समाजसेवेतील योगदानाची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील शालेय शिक्षक दत्तात्रय पांडुरंग आभाळे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार 2026’ जाहीर करण्यात आला आहे. नाशिक येथील ज्ञानदीप सामाजिक विकास संस्थेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव केला जाणार आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. 23 मे रोजी सायंकाळी 4 वाजता नाशिक येथील वावरेनगर, कामटवाडे येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास रिपब्लिकन सेनेचे ॲड. अमन आंबेडकर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू), नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त भगवान वीर, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे राज्य प्रवक्ते अविनाश शिंदे तसेच मनपा सहाय्यक उपायुक्त नानासाहेब साळवे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठवले आणि सचिव मिलिंद कळवणकर यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील भगवती माता विद्यालयात कार्यरत असलेले दत्तात्रय आभाळे यांनी आपल्या कार्यातून शिक्षण आणि समाजसेवेचा अनोखा संगम घडवून आणला आहे. अकलापूर हे त्यांचे मूळ गाव असून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. बालवयातच पितृछत्र हरपल्यानंतर आई आणि काकांच्या सहकार्याने त्यांनी शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवली. आर्थिक आणि कौटुंबिक अडचणींवर मात करत शिक्षक होण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले.
आज शिक्षक म्हणून कार्यरत असताना ते विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ग्रामीण भागातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक मदत व मार्गदर्शन करून शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही आभाळे यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. ग्रामीण युवकांमध्ये शिक्षणाबाबत जागृती निर्माण करणे, स्वच्छता अभियान राबविणे, पर्यावरण संवर्धन उपक्रमात सहभाग घेणे तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन अशा विविध सामाजिक उपक्रमांत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र दत्तात्रय आभाळे यांचे अभिनंदन होत आहे.
