• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

न्यू इंग्लिश स्कूल 1988 बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात

ByMirror

May 2, 2026
जगात लहाण - मोठे पेक्षा माणूसकी हाच खरा धर्म आहे -विजय भालसिंग

कामगार दिनानिमित्त हॉटेल मधील कामगारांचा सन्मान; मित्रांच्या जुन्या आठवणींना उजाळा


जगात लहाण – मोठे पेक्षा माणूसकी हाच खरा धर्म आहे -विजय भालसिंग

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या इयत्ता 10 वी (एस.एस.सी.) 1988 बॅचचा स्नेह मेळावा महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने शहरात उत्साहात पार पडला. तब्बल 36 वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत जुन्या मैत्रीचा आनंद लुटला.


या विशेष प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत कामगार दिनानिमित्त हॉटेलमधील सर्व कामगारांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. हा उपक्रम कामगारांच्या मनाला भावला. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, उद्योजक रामराव मुनफन, सेवानिवृत्त मेजर रविंद्र नाईक, शिरीष गायकवाड, अरुण कुंजीर, रामदास इंगळे, दामोधर भालसिंग, वसंत कासार, राजेंद्र निमसे, हरिचंद्र माने, विनायक इंगळे, पोपट बाचकर, दादा पडवळकर, सुरेश जासुद, संगिता मते आदी मान्यवर उपस्थित होते.


या स्नेह मेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सध्याच्या जीवनप्रवासाबद्दल माहिती देत एकमेकांशी संवाद साधला. शालेय जीवनातील गमतीजमती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्या काळातील अनुभव यांना उजाळा देत वातावरण भावनिक व आनंददायी झाले. मैत्री, सहकार्य आणि आपुलकी यांचा पुन्हा एकदा अनुभव घेत सहभागींच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. कामगार दिनाच्या निमित्ताने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे असून, कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


विजय भालसिंग म्हणाले की, स्नेह मेळावा केवळ जुन्या मित्रांना भेटण्याचा कार्यक्रम नाही, तर आपल्या जीवनप्रवासाचा आढावा घेण्याची एक सुंदर संधी आहे. 1988 मध्ये आपण जेव्हा शाळा सोडून वेगवेगळ्या वाटा निवडल्या, तेव्हा प्रत्येकाच्या आयुष्याचा वेगळा प्रवास सुरू झाला. आज 36 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येताना आपण किती बदललो आहोत, किती अनुभव घेतले आहेत, हे पाहून अभिमान वाटतो.


आपल्या शाळेने आपल्याला केवळ शिक्षण दिले नाही, तर माणूस म्हणून घडवले. त्या काळात शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांमुळेच आपण आज समाजात विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करत आहोत. आज कामगार दिनाच्या निमित्ताने आपण कामगार बांधवांचा सन्मान केला, समाजाच्या प्रगतीत कामगारांचे योगदान अमूल्य आहे. आपण कोणत्याही पदावर असलो, तरी कामगारांच्या कष्टांची जाणीव ठेवणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी उद्योजक रामराव मुनफन, सेवानिवृत्त मेजर रविंद्र नाईक, शिरीष गायकवाड व रामदास इंगळे यांनी आपल्या भाषणात शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.


जगात लहान-मोठा, श्रीमंत-गरीब असा भेद असू शकतो, पण माणुसकीपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही. आपण सर्वांनी माणुसकी जपली, तर समाज अधिक सुंदर आणि सुसंवादी बनेल, असेही भालसिंग यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *