मासूम संस्थेच्या मूल्यांकनात भाई सथ्था नाईट हायस्कूल ठरली राज्यात दुसरी; शाळेचा गौरव रात्रशाळेत केवळ
पाठ्यपुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांना जीवनात सक्षमपणे उभे करण्याचे काम -डॉ.पारस कोठारी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विविध कारणांमुळे अर्धवट शिक्षण सोडावे लागलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शहरातील हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये ‘शिक्षणदूत’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्या प्रयत्नातून मोठ्या संख्येने शिक्षणापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत प्रवेश देण्यात आला.
मुंबई येथील मासूम संस्थेच्या मूल्यांकनात सर्वाधिक विद्यार्थी प्रवेशित करून त्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसविणाऱ्या शाळांमध्ये भाई सथ्था नाईट हायस्कूलने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेला ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मासूम संस्थेचे डायरेक्टर कमलाकर माने, एस.एस.सी. प्रमुख गुरुप्रसाद पाटील आणि प्रोग्राम हेड संदीप शेलार यांच्या हस्ते नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, प्राचार्य सुनील सुसरे आणि ज्येष्ठ शिक्षक गजेंद्र गाडगीळ यांना ट्रॉफी व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. पारस कोठारी म्हणाले की, भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधातून शिक्षण दिले जाते. शिक्षणाची संधी कोणत्याही वयात मिळू शकते, ही या शाळेची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे येथे एकाच वर्गात नवरा-बायको, सासू-सून, आई-मुलगी तसेच वडील-मुलगा यांनी एकत्र शिक्षण घेऊन यशस्वीरीत्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. शिक्षणासाठी वयाची मर्यादा नसून इच्छाशक्ती, जिद्द आणि आयुष्यात पुढे जाण्याची तयारी महत्त्वाची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. रात्रशाळेत केवळ पाठ्यपुस्तकांपुरते शिक्षण न देता विद्यार्थ्यांना जीवनात सक्षमपणे उभे राहण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि कौशल्यविकासावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर मासूम संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा व विविध व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन दिले जात असल्याबद्दल मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर यांचे विशेष आभार मानले.
मासूम संस्थेचे डायरेक्टर कमलाकर माने म्हणाले की, शिक्षण ही केवळ शाळेत जाण्याची प्रक्रिया नाही, तर माणसाला आत्मविश्वास, ज्ञान, कौशल्य आणि स्वाभिमान देणारी शक्ती आहे. परिस्थितीमुळे एखाद्या विद्यार्थ्याचे शिक्षण अर्धवट राहिले, म्हणून त्याच्या आयुष्यातील संधी संपत नाहीत. योग्य मार्गदर्शन आणि जिद्द असेल तर कोणत्याही वयात पुन्हा शिक्षण सुरू करता येते, हे भाई सथ्था नाईट हायस्कूलने आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. आजच्या काळात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य, आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणारे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून मासूम संस्थेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

