नितीन शिरसाठ हत्याकांडातील आरोपींना अटक करण्याची मागणी; उपोषणाचा तिसरा दिवस
महिला मुलाबांळांसह उपोषणात सहभागी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नितीन शिरसाठ यांच्या निर्घृण खुनातील आरोपींना तात्काळ अटक करावी व त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिरसाठ कुटुंबीयांसह गावातील महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर मुलाबाळांसह उपोषण सुरु केलेले आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि.29 एप्रिल) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
पाठिंब्याचे पत्र रिपाई महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योतीताई पवार यांनी स्वाती नितीन शिरसाठ यांना दिले. यावेळी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष शीतल नाटेकर, शहर उपाध्यक्ष सोनाली साळवे, शहराध्यक्ष सविता भालेराव, विश्रांती पठारे, तालुका अध्यक्ष सारिका साळवे, अलका अल्हाट, नंदा साळवे, सविता शिरसाठ, प्रतीक्षा लोखंडे, टेरेसा शिरसाठ, दिपाली शिरसाठ, संगीताताई शिरसाठ आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी घोडेश्वरी हॉस्पिटल, घोडेगाव (ता. नेवासा) येथे नितीन शिरसाठ यांची भरदिवसा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला तब्बल 70 ते 80 दिवस उलटूनही आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. मृत नितीन शिरसाठ यांच्या पत्नीने अत्यंत भावनिक शब्दांत आपली व्यथा मांडताना सांगितले की, “मी त्या घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित होते. आमची 3 महिन्यांची मुलगी आहे व आणखी पाच लहान मुले आहेत. आरोपी अजूनही मोकाट असल्याने आमच्या कुटुंबावर केव्हाही हल्ला होऊ शकतो. आम्हाला सतत भीतीच्या छायेत जगावे लागत आहे.” तसेच, आरोपींना कोणीतरी पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त करत, “पोलीस प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव आहे?” असा सवालही कुटुंबीयांनी उपस्थित केला.
सदर प्रकरणातील आरोपी हे ‘फुलमाळी टोळी’शी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या टोळीवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती असून, पोलीस प्रशासनाला याची पूर्ण कल्पना असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तरीही त्यांच्यावर कठोर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही टोळी संघटित पद्धतीने गुन्हे करत असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होणे अत्यावश्यक आहे. केवळ आश्वासन देऊन वेळकाढूपणा करण्याऐवजी पोलिसांनी महिलांच्या उपोषणाची दखल घेऊन ठोस पावले उचलावीत, अशी मागणी उपोषणकर्त्यांसह रिपाई महिला आघाडीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. नितीन शिरसाठ हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा रिपाई महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.
