• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

“पोटगीच्या न्यायासाठी महिलेचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण”

ByMirror

May 28, 2026
पतीला संरक्षण देत असल्याचा आरोप; मुलाच्या शिक्षणावरही संकट

‘कोर्टाच्या वॉरंटची अंमलबजावणी होत नाही’; सोनई पोलिसांवर महिलेचे गंभीर आरोप


पतीला संरक्षण देत असल्याचा आरोप; मुलाच्या शिक्षणावरही संकट

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- न्यायालयाने मंजूर केलेल्या पोटगीच्या वॉरंटची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत रुपाली गोरक्षनाथ डोळे या महिलेने आपल्या लहान मुलासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. सोनई पोलीस स्टेशनमधील काही पोलिस कर्मचारी जाणीवपूर्वक पतीला संरक्षण देत असून न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी टाळत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी निवेदनातून केला आहे.


रुपाली डोळे या मूळच्या नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील असून सध्या त्या पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी शिराळ येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पती गोरक्षनाथ आसाराम डोळे यांनी त्यांना नांदविण्यास नकार देत मारहाण केली तसेच विष पाजून जीव घेण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःसह मुलगा शिवम गोरक्षनाथ डोळे याच्या उदरनिर्वाहासाठी पाथर्डी न्यायालयात अन्न-वस्त्र पोटगीसाठी क्रिमिनल अर्ज क्रमांक 22/2024 दाखल केला होता.


या प्रकरणात न्यायालयाने रुपाली डोळे व त्यांच्या मुलासाठी दरमहा चार हजार रुपयांची पोटगी मंजूर केली. मात्र पती गोरक्षनाथ डोळे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पोटगीची रक्कम भरली नाही तसेच न्यायालयातही हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात एक लाख 21 हजार रुपयांच्या वसुलीसाठी वॉरंट काढले. हे वॉरंट बजावणीसाठी सोनई पोलीस स्टेशनकडे पाठविण्यात आले होते.


मात्र संबंधित पोलिस कर्मचारी वॉरंटची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप रुपाली डोळे यांनी केला आहे. वंजारवाडी बिटचे हेड कॉन्स्टेबल राख, पवार व कासार हे जाणीवपूर्वक कारवाई टाळत असून हेड कॉन्स्टेबल राख हे गोरक्षनाथ डोळे यांचे नातेवाईक असल्याने खोटे अहवाल न्यायालयात सादर केले जात असल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे.


महिलेने आणखी गंभीर आरोप करताना सांगितले की, वॉरंट बजावणीसाठी हेड कॉन्स्टेबल यांना पैसे दिले. मात्र तरी देखील ते उडवाउडवीचे उत्तर देत आहे. रुपाली डोळे यांनी पुढे म्हटले आहे की, पोटगीची वसुली टाळण्यासाठी गोरक्षनाथ डोळे यांनी आपल्या नावावरील वंजारवाडी येथील गट क्रमांक 160 मधील 41 आर जमीन पुतण्याच्या नावावर बोगस खरेदीखताद्वारे वर्ग केली. ही मालमत्ता जप्त होऊ नये आणि पोटगीची वसुली टाळता यावी, यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


तसेच गोरक्षनाथ डोळे हे प्रत्यक्षात वंजारवाडी येथे राहत असतानाही पोलिसांकडून “तो गावात राहत नाही” असे खोटे अहवाल दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. वॉरंट आल्याची माहिती मिळताच पोलिसांकडून त्यांना नातेवाईकांकडे पळून जाण्याचा सल्ला दिला जात असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


पोटगी न मिळाल्यामुळे स्वतःवर व मुलावर उपासमारीची वेळ आल्याचे महिलेने सांगितले. पोटगीशिवाय उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने मुलाच्या शिक्षणावरही परिणाम झाला आहे. शाळेची फी न भरल्यामुळे खांडगाव येथील शाळेने त्याला शाळेतून काढण्याबाबत नोटीस दिल्याचे त्यांनी नमूद केले. यापूर्वीही त्यांनी 18 मे 2026 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोटगी वॉरंटबाबत तक्रार दिली होती. मात्र त्यानंतरही कारवाई न झाल्याने अखेर आपल्या लहान मुलासह अमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, न्यायालयीन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून थकीत पोटगीची वसुली करावी तसेच गोरक्षनाथ डोळे यांना न्यायालयासमोर हजर करण्यात यावे, अशी मागणी रुपाली डोळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *