प्रिंटिंग व्यवसायातून उभा केला आदर्श आणि सामाजिक कार्यातही योगदान; जिद्दीला रोटरीचा सलाम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिव्यांगत्वावर मात करत स्वतःच्या कर्तृत्वाने यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या शहरातील पोपट शेळके यांचा अहमदनगर रोटरी सेंटर या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने ‘सक्षम आत्मनिर्भय’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या जिद्द, संघर्ष आणि समाजसेवेच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
अहमदनगर रोटरी सेंटरच्या संमेलनात प्रांतपाल तथा अध्यक्ष सुधीर लातूरे यांच्या हस्ते शेळके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सौ. संगिता लातुरे, सहाय्यक प्रांतपाल माधुरा झावरे, सचिव राजगोपाल तापडिया, सेक्रेटरी सुनील मुथा, एक्झिक्युटिव सेक्रेटरी हरीश नय्यर, रोटरीचे अध्यक्ष सुनिल कटारिया यांच्यासह संचालक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांना मदतीचा हात देणे, शैक्षणिक सहाय्य, आरोग्य सेवा, जनजागृती, महिला सक्षमीकरण तसेच पर्यावरण संवर्धन यांसारखी विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी अशा पुरस्कारांच्या माध्यमातून गौरविण्यात येते.
पोपट शेळके यांनी आपल्या दिव्यांगत्वावर मात करत प्रिंटिंग व्यवसायात यश मिळवले आहे. स्वतःचा संसार सांभाळत असतानाच ‘समाजाचे काहीतरी देणे लागतो’ या भावनेतून त्यांनी सामाजिक कार्यातही मोलाचे योगदान दिले आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ उपक्रम, रक्तदान शिबिरे तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून ते सक्रियपणे कार्यरत आहेत. तसेच प्रहार दिव्यांग संघटनेच्या माध्यमातूनही ते दिव्यांग बांधवांसाठी काम करत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रोटरी सेंटरच्या वतीने त्यांना ‘सक्षम आत्मनिर्भय’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानाबद्दल प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे, संदीप सुपेकर, हमीद शेख यांनी त्यांचे अभिनंदन केले.
