• Tue. Apr 21st, 2026

स्व. अरुणकाका जगताप स्मृतीदिनानिमित्त भिंगारला वृक्षारोपण

ByMirror

Apr 21, 2026

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम; वृक्षांच्या रूपाने जिवंत ठेवणार आठवण


अरुणकाकांचे सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय क्षेत्रातही मोठे योगदान -संजय सपकाळ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील छावणी परिषदेच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. याचबरोबर उद्यान परिसरात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आणि सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम पार पडला.


स्व. अरुणकाका जगताप यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते स्व. अरुणकाका जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महेंद्र जाधव सर व मीनाताई परदेशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी निताताई देवराईकर, ज्योतीताई भिंगारदिवे, प्रांजली सपकाळ, मिनाताई रासणे, जाइताई बहिरट, सुभद्राताई लंगोटे, सचिन चोपडा, सि.ए. रविंद्र कटारिया, जहिर सय्यद, सर्वेश सपकाळ, संजय भिंगारदिवे, दिलीपराव ठोकळ, दिपकराव धाडगे, अशोक पराते, संतोष लुणिया, दिपक अमृत, ताराचंद ठोकळ, विलासराव आहेर, मनोहर दरवडे, अभिनित सपकाळ, अविनाश जाधव, दिपकराव घोडके, सुधीर कपाळे, दिपक लिपाने, छोटू जाधव, सरदारसिंग परदेशी, रामनाथ गर्जे, दशरथराव मुंडे, प्रकाश देवळालीकर, मुन्ना वाघस्कर, योगेश चौधरी, सुहास देवराईकर, भरत डंगोरे, किरण शेलुकर, मेजर, संदिप जाधव, ज्ञानेश्‍वर धोत्रे, सुदामराव गांधले, तुषार घाडगे गुरुजी, विनोद खोत, विशाल भामरे, अनिल हळगावकर आदींसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, “स्व. अरुणकाका जगताप यांचे कार्य हे केवळ राजकीय क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते, तर ते सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय क्षेत्रातही मोठे योगदान देणारे होते. त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करणे होय. म्हणूनच दरवर्षी त्यांची जयंती व पुण्यतिथी वृक्षारोपणाने साजरी करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचे रक्षण ही आजच्या काळाची गरज असून, अशा उपक्रमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आगामी काळात अधिक व्यापक प्रमाणात उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.


सचिन चोपडा म्हणाले की, “स्व. अरुणकाका जगताप यांचे कार्य समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेले हे वृक्षारोपण म्हणजे त्यांच्या विचारांचे जतन करण्याचा एक प्रयत्न आहे. आज लावलेली झाडे ही केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर त्यांच्या कार्याची सजीव आठवण म्हणून उभी राहतील. त्यांनी जपलेली माणुसकी, समाजाशी असलेले नाते आणि सर्वसमावेशक विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. अशा उपक्रमातून नव्या पिढीला योग्य दिशा मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


संजय भिंगारदिवे म्हणाले की, “आजच्या धावपळीच्या जीवनात आपण पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतो, परंतु स्व. अरुणकाका जगताप यांनी नेहमीच पर्यावरण संवर्धनाला चालना दिली. त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून आपण केवळ श्रद्धांजली अर्पण करत नाही, तर भविष्यासाठी एक जबाबदार पाऊल उचलत आहोत. स्वच्छता अभियानातून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेशही दिला जात आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसराची जबाबदारी स्वीकारून अशा उपक्रमात सहभागी व्हावे, हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *