• Sat. Jun 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात “एज लॉकिंग वॉकिंग स्ट्रीट” अभियानाचा प्रारंभ

ByMirror

Apr 20, 2026
शहरात “एज लॉकिंग वॉकिंग स्ट्रीट” अभियानाचा प्रारंभ

निरोगी आरोग्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा पुढाकार

दररोज ३० मिनिटे चालण्याचा संकल्प; निगेंट्रॉपी चळवळीतून जीवनशैलीत बदल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निरोगी व सुदृढ आरोग्याचा संदेश देत “एज लॉकिंग वॉकिंग स्ट्रीट” या अनोख्या उपक्रमाची शहरात सुरुवात करण्यात आली आहे. जीवनशैलीतील सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि नागरिकांना नियमित चालण्याची सवय लागावी या उद्देशाने हा “निगेंट्रॉपी” आधारित अभियान पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने राबविण्यात आला आहे.


या उपक्रमांतर्गत पंपिंग स्टेशन ते कराळे जिम या मार्गावर सुमारे ३० मिनिटांचे वॉकिंग करण्यात आले. नागरिकांना दररोज चालण्याचे महत्त्व पटवून देत आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, बीर बहादूर प्रजापती, अशोक भोसले, पोपट भोसले, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. अमित थोरात, प्रकाश गोसावी, प्रतीक म्हस्के, रमा आढाव, संजय शेकडे, बाजीराव गव्हाणे, लखन साळवे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना अशोक सब्बन यांनी सांगितले की, आज माणूस विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती करत असला तरी आरोग्याच्या बाबतीत मागे पडत आहे. “आपण जास्त जगतोय, पण चांगलं जगत नाही. वय वाढतंय, पण आरोग्य घटतंय,” ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी जीवनशैलीत परिवर्तन आवश्यक आहे. चालण्यातून आरोग्यक्रांतीचा नवा मार्ग सापडू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
“निगेंट्रॉपी” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम शरीर आणि मनातील अव्यवस्था कमी करून सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा संदेश देतो. चुकीचा आहार, हालचालींचा अभाव आणि ताणतणाव यामुळे शरीरात “एंट्रॉपी” वाढते, ज्यामुळे आजार आणि थकवा वाढतो. यावर उपाय म्हणून संतुलित आहार (फूडिसीन) आणि नियमित श्रम (वॉकिंग-जॉगिंग) यांचा समतोल साधणे गरजेचे असल्याचे मत ॲड. कारभारी गवळी यांनी मांडले.


“एज लॉकिंग” ही संकल्पना वय थांबवण्याबद्दल नसून वृद्धत्वाचा वेग कमी करण्याबाबत आहे. दररोज ३० ते ६० मिनिटे चालल्यास शरीरातील पेशी अधिक कार्यक्षम राहतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मानसिक ताजेपणा टिकून राहतो. पंपिंग स्टेशन ते कराळे जिम हा मार्ग आता “वॉकिंग स्ट्रीट” म्हणून ओळखला जाऊ लागला असून तो एक प्रकारचा सार्वजनिक आरोग्य मार्ग (Public Health Corridor) बनत आहे. कोणतेही शुल्क नसलेला, सर्व वयोगटांसाठी खुला असलेला हा उपक्रम आरोग्याला वैयक्तिक नव्हे तर सामाजिक चळवळीचे स्वरूप देत आहे.


या अभियानामुळे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक बदलही घडून येतो. नियमित चालण्यामुळे मेंदूमध्ये सकारात्मक सवयींचे पॅटर्न तयार होऊन दीर्घकालीन जीवनशैलीत परिवर्तन होते. “मेंदू बदलला की समाज बदलतो,” हा संदेश या चळवळीच्या माध्यमातून देण्यात येत आहे. वाढते आजार, वाढता आरोग्य खर्च आणि औषधांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ही चळवळ महत्त्वाची ठरत असून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
शेवटी, प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा — “मी दररोज ३० मिनिटे माझ्या आयुष्यासाठी देऊ शकतो का?” याचे उत्तर “हो” असेल, तर आरोग्यदायी आयुष्याची सुरुवात निश्चितच होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *