• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या शक्तींविरोधात पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार

ByMirror

Apr 17, 2026
समाजजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय

समाजजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय


जातीय समीकरणे, भावनिक प्रभाव आणि पैशांचा वाढता प्रभाव लोकशाहीसमोरील नवे आव्हान -ॲड. गवळी

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – सध्याच्या भारतीय राजकारणात निवडणुका जिंकण्यासाठी पारंपरिक मूल्यांपेक्षा जातीय समीकरणे, भावनिक प्रभाव आणि आर्थिक ताकद यांचा वाढता प्रभाव दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांवर प्रभाव टाकण्याची विलक्षण क्षमता असलेल्या व्यक्तींना ओळखून त्यांच्याविरोधात समाजजागृती करण्याचा निर्णय पीपल्स हेल्पलाईनने घेतला आहे.
याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


गवळी म्हणाले की,
“ज्या व्यक्तीकडे जातीय समीकरणांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आहे, धार्मिक माध्यमांतून भावनिक वातावरण निर्माण करण्याचे कौशल्य आहे आणि मतदारांवर मानसिक तसेच आर्थिक प्रभाव टाकण्याची यंत्रणा आहे, अशा व्यक्तीसाठी राजकारणात उच्च स्थान गाठणे अवघड नसते.”
राजकीय वास्तवावर भाष्य
गवळी यांनी सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर टीका करताना नमूद केले की,
लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती यांसारख्या मूलभूत मूल्यांना दुय्यम स्थान मिळत असून, त्याऐवजी जातीय ध्रुवीकरण, अंधश्रद्धा आणि भावनिक नियंत्रण यांचा प्रभाव वाढत आहे.


ते पुढे म्हणाले —
“मतदारांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी काही घटकांचा संगनमताने वापर केला जातो. यात जातीय ध्रुवीकरण, अंधश्रद्धांचा प्रभावी वापर, भावनिक आवाहन आणि आर्थिक साधनांद्वारे मतांची हालचाल या गोष्टींचा समावेश होतो. अशा सर्व घटकांवर प्रभुत्व असलेली व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षासाठी ‘विजयी उमेदवार’ ठरू शकते.”
NGI व RECONSCIO गव्हर्नन्सचा संदर्भ
दरम्यान, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असलेले Ashok Kharat यांनी राजकारणात प्रवेश का टाळला, यावर बोलताना गवळी यांनी ‘अजनुकीय माहिती’ (NGI) आणि ‘रिकॉन्शिओ गव्हर्नन्स’ या संकल्पनांचा उल्लेख केला.
ते म्हणाले —
“आजचे राजकारण मुख्यतः ‘सबकॉन्शिओ गव्हर्नन्स’वर आधारित आहे. म्हणजेच मतदारांचे निर्णय त्यांच्या मनात आधीपासून साठलेल्या संस्कार, जातीय ओळख आणि अंधश्रद्धांवर आधारित असतात.”
राजकारणातील तडजोडींचे वास्तव
राजकारणातील वास्तव परिस्थिती लक्षात घेतल्यास —
तडजोडी स्वीकारणे
नैतिक मूल्यांपेक्षा राजकीय समीकरणांना प्राधान्य देणे
सतत टीका सहन करणे
मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडणे
या गोष्टी प्रत्येक प्रभावशाली व्यक्तीस मान्य असतीलच असे नाही, असेही त्यांनी नमूद केले.


काही व्यक्ती थेट राजकारणात सहभागी होण्याऐवजी बाहेरूनच प्रभाव टाकण्यास प्राधान्य देतात. यामागे स्पष्ट सामाजिक व राजकीय गणित असून, प्रभाव टिकवून ठेवत थेट जबाबदाऱ्यांपासून दूर राहण्याची ही भूमिका असल्याचे गवळी यांनी सांगितले.
समाजजागृती मोहिमेची घोषणा
पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने लवकरच व्यापक समाजजागृती मोहीम राबविण्यात येणार असून,
मतदारांना सजग करण्यासाठी —
विविध कार्यक्रम
चर्चासत्रे
जनजागृती उपक्रम
आयोजित केले जाणार आहेत.
“लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी जागरूक मतदार हीच खरी ताकद आहे,” असा संदेश या मोहिमेतून दिला जाणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *