• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

नियमबाह्य गॅस गोडाऊनचा धोका; बसपाच्या वतीने तक्रार

ByMirror

Apr 17, 2026
नियमबाह्य गॅस गोडाऊनचा धोका; बसपाच्या वतीने तक्रार

शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांच्या जीविताचा प्रश्‍न ऐरणीवर; शाळेलगत गॅस टाक्यांचा साठा;


इंडियन गॅस वितरकावर कारवाईची मागणी; अन्यथा 20 एप्रिलपासून मुंबईत उपोषणाचा इशारा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील मौजे राशीन येथे इंडियन गॅसच्या ग्रामीण वितरकांकडून करण्यात येणाऱ्या नियमबाह्य गॅस गोडाऊन व वाहतूक व्यवस्थेमुळे स्थानिक ग्रामस्थांसह जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असल्याची तक्रार बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. संबंधित गॅस वितरकाचा परवाना तात्काळ रद्द करून कठोर कारवाई करावी, अन्यथा 20 एप्रिलपासून मुंबई येथील इंडियन ऑईल भवन, बांद्रा कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


कर्जत तालुक्यातील राशीन येथील इंडियन गॅसच्या वितरकांकडून मोठ्या प्रमाणात गॅस वितरण केले जाते. मात्र, या वितरकाने शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीलगत मोठ्या प्रमाणावर गॅस टाक्यांचा साठा केल्याचा आरोप आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध जोपासून हे सर्व प्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील काळुबाई देवस्थान परिसरात पूर्वी झालेल्या गॅस स्फोटाच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी दत्तात्रय आत्माराम सोनवणे यांनी यापूर्वीही तक्रार केली होती. ग्रामस्थांच्या आणि शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित करत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.


या प्रकरणी 19 मे 2025 रोजी तहसीलदारांकडून चौकशी करण्यात आली असून त्याचा अहवाल संबंधित गॅस एजन्सीच्या क्षेत्रीय प्रबंधक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या बहुजन समाज पार्टी व अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने 7 जानेवारी रोजी निवेदन देऊन 23 जानेवारीपासून सात दिवस बेमुदत उपोषणही केले होते. तरीदेखील प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच, संबंधित गॅस वितरकाकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची परवानगी न घेता नियमबाह्य पद्धतीने गॅस वाहतूक केली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. याशिवाय, इतर ठिकाणी अनधिकृतरित्या गॅस टाक्यांची विक्री व वितरण होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.


राशीन परिसरात सुमारे 5000 लोकसंख्या वास्तव्यास असून, गॅस गोडाऊन शाळेलगत असल्याने भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित गॅस वितरकाचा परवाना तात्काळ रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू मंत्री, इंडियन गॅसचे चेअरमन आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासह संबंधित विभागांना पाठविण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *