• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

भवानी मराठा महिला ग्रुपतर्फे महिलांना निरोगी आरोग्यासाठी तणावमुक्त जीवनशैलीचा कानमंत्र

ByMirror

Apr 10, 2026
आरोग्य सेमिनार उत्साहात संपन्न

आरोग्य सेमिनार उत्साहात संपन्न


स्त्री आरोग्य, कॅन्सर प्रतिबंधावर डॉ. कल्याणी चौधरी यांचे मार्गदर्शन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील स्वास्तीक हॉस्पिटलमध्ये भवानी मराठा महिला ग्रुपच्या वतीने महिला आरोग्य सेमिनाराचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये महिलांना निरोगी आरोग्यासाठी तणावमुक्त जीवनशैलीचा कानमंत्र देण्यात आला.


या सेमिनारमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. कल्याणी चौधरी उपस्थित होत्या. त्यांनी स्त्री आरोग्य, महिला प्रजनन आरोग्य तसेच कॅन्सर प्रतिबंध या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासण्या करून घेणे अत्यंत आवश्‍यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः स्तन कॅन्सर व गर्भाशयाच्या कॅन्सरच्या लक्षणांविषयी जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले.


यावेळी त्यांनी संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक आरोग्याची काळजी तसेच तणावमुक्त जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी महिलांनी स्वतःसाठी वेळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.


सेमिनारदरम्यान उपस्थित महिलांनी विविध आरोग्यविषयक प्रश्‍न उपस्थित केले. डॉ. चौधरी यांनी सर्व प्रश्‍नांची सविस्तर उत्तरे देत उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले. या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.


कार्यक्रमाचे आयोजन भवानी मराठा महिला ग्रुपच्या सदस्यांनी केले होते. यावेळी भवानी मराठा महिला ग्रुपच्या अध्यक्षा माधवी दांगट, प्रमुख अतिथी डॉ. कल्याणी चौधरी पाटील, तसेच कमिटी मेंबर्स प्रिया दांगट, भारती भगत, वैशाली गुंड, सोनाली नरवडे, निलिमा म्हस्के, प्रियांका म्हस्के, सुजाता पायमोडे, अमृता वाकळे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *