सत्यशोधक प्रागतिक मंच निर्मिती विचार मंचच्या वतीने शनिवारी होणार गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना कोल्हापूर येथील सत्यशोधक प्रागतिक मंच निर्मिती विचार मंचच्या वतीने महात्मा फुले राष्ट्रीय सन्मान पुरस्कार-2026 जाहीर करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आदित्य म्हमाने व सचिव अंतिमा कोल्हापूरकर यांनी दिली आहे.
शनिवार दि. 11 एप्रिल, 2026 रोजी सकाळी 10:30 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते बोरुडे यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. जालिंदर बोरुडे स्वखर्चाने फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 34 वर्षापासून शिबिर घेऊन हजारो गोरगरीब नेत्रदोष असलेल्या रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणत आहे. या सेवेच्या माध्यमातून अनेकांना नवदृष्टी मिळाली आहे. तर नागरिकांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रोत्साहित करुन अनेकांचे नेत्रदान घडवून आनले आहे. तसेच फाऊंडेशनच्या माध्यमातून अवयवदान जनजागृतीसह विविध सामाजिक उपक्रम सुरु आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन बोरुडे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
