कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलसह वैयक्तिक स्पर्धांमध्ये खेळाडूंची दमदार कामगिरी
‘फिटनेस हीच खरी संपत्ती’ -उपप्राचार्य अनिल आठरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालयाच्या मेरा युवा भारत अहिल्यानगरच्या वतीने न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल या सांघिक खेळांसोबतच गोळा फेक आणि धावणे या वैयक्तिक स्पर्धांनीही रंगत आणली. अत्यंत चुरशीच्या लढतींमुळे संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. महाविद्यालयाच्या जिमखाना मैदानावर खेळाडूंची लगबग पाहायला मिळाली.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल आठरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मेरा युवा भारतचे सत्यजीत संतोष, जिमखाना चेअरमन अनंत पंडित, शरद मगर, धन्यकुमार हराळ, रमेश गाडगे, श्रीकृष्ण मुरकुटे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी व खेळाडू उपस्थित होते.

प्रास्ताविकात शरद मगर यांनी सांघिक खेळांसोबत वैयक्तिक स्पर्धांचेही आयोजन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. शासकीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यास खेळाडूंच्या करिअरला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले. न्यू आर्ट्स महाविद्यालयातून अनेक दिग्गज खेळाडू घडले असून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. विशेषत: कबड्डी संघाने राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केल्याचेही त्यांनी सांगितले.

उपप्राचार्य अनिल आठरे यांनी आपल्या भाषणात खेळाडूंच्या फिटनेसचे महत्त्व अधोरेखित केले. “चांगले आरोग्य असेल तरच खेळाडू आपल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. शरीर हीच खरी संपत्ती आहे, त्यामुळे प्रत्येकाने फिटनेसकडे लक्ष देणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
सत्यजीत संतोष म्हणाले की, मेरा युवा भारत हा उपक्रम केवळ क्रीडा स्पर्धांपुरता मर्यादित नसून, तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. आजच्या स्पर्धांमधून खेळाडूंमध्ये असलेली ऊर्जा, जिद्द आणि स्पर्धात्मक वृत्ती स्पष्टपणे दिसून येते. ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळाल्यास तेही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात, यावर आमचा विश्वास आहे.
क्रीडा क्षेत्र हे केवळ शारीरिक ताकदीचे नसून मानसिक स्थैर्य, शिस्त आणि टीमवर्क शिकवणारे माध्यम आहे. अशा स्पर्धांमधून खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढतो. पुढील काळात अधिक मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आयोजित करून अधिकाधिक युवकांना संधी देण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण स्पर्धा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय जिमखाना विभागाचे विशेष सहकार्य लाभले.
