रोकडेश्वर हमुमान मंदिरातील गरजूंना मिष्टान्न भोजनाचे वाटप; स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रम
कचरामुक्त व हरित शहर करण्यासाठी विशेष प्रयत्न -महापौर ज्योतीताई गाडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुप व भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने छावणी परिषदेच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ झाडे लावण्यात आली. उद्यानात स्वच्छता अभियान राबवून रोकडेश्वर हमुमान मंदिरातील गरजूंना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमातून स्व. अरुणकाका जगताप यांनी जोपासलेली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रारंभी अरुणकाकांच्या प्रतिमेस गुलाबांचा पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापौर ज्योतीताई गाडे, नगर तालुका पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे व महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन मन्नूशेठ झंवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, छावणी परिषदेच्या माजी नगरसेविका शुभांगी साठे, उद्योजक चुन्नीलाल झंवर, रवीशेठ फल्ले, शिवसेनेचे सुनील लालबोंद्रे, रवी लालबोंद्रे, आरपीआयचे अमित काळे, मंगेश मोकळ, प्रकाश भिंगारदिवे, दीपक अमृत, रमेशराव वराडे, अशोक पराते, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, दिलीप ठोकळ, जैद सय्यद, अनिल हळगावकर, ताराचंद ठोकळ, संजय भिंगारदिवे, रतन मेहेत्रे, दीपक लिपाने, शुभम भंडारी, अक्षय नागापुरे, अनंत सदलापूर, श्यामराव वागस्कर, अविनाश जाधव, रामनाथ गर्जे, प्रज्योतसिंग सागू, सुनील कर्डिले, राजू कांबळे, मुन्ना वाघस्कर, सुदाम गांधले, विकी भालसिंग, मच्छिंद्र बेरड, तुषार घाडगे गुरुजी, संपतराव बेरड, अरुण चव्हाण, सुधीर कपाळे, विशाल भामरे, दिनेश लंगोटे, सागर चवंडके, गणेश शिंदे, काशिनाथ साळुंके, प्रसाद भिंगारदिवे, श्रीकांत कदम, शशिकांत बोरुडे आदी उपस्थित होते.
महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, स्व. अरुणकाका जगताप यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अशा उपक्रमांचे आयोजन करणे कौतुकास्पद आहे. पर्यावरण, स्वच्छता आणि समाजसेवा या गोष्टींवर लक्ष दिल्यास समाज अधिक सक्षम होणार आहे. हरदिनच्या माध्यमातून सातत्याने सुरु असलेली वृक्षारोपण व स्वच्छता अभियानाची मोहिम कौतुकास्पद आहे. महापालिकेच्या माध्यमातून कचरामुक्त शहर व हरित शहर करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु असून, यामध्ये जनतेच्या सहभागाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी सकारात्मक बदल घडविण्यासाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचे स्पष्ट करुन हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
संजय सपकाळ म्हणाले की, स्व. अरुणकाका जगताप यांचे कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त त्यांना गुलाबाचा हार घालून सत्कार केला जात असे, मात्र त्यांच्या निधानाने त्यांची जयंती दरवर्षी वृक्षारोपणाने साजरी केली जाणार आहे. त्यांचे विचार व सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन वृक्षारोपण, स्वच्छता आणि अन्नदान या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही सर्वांनी स्वीकारली आहे. पुढील काळातही अधिक व्यापक स्वरूपात सामाजिक उपक्रम राबवून समाजाच्या सेवेसाठी कार्यरत राहू, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उद्यान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. नागरिकांनी आपल्या परिसराची जबाबदारी घेतल्यास शहर अधिक स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होणार आहे. शहर हरित व सुंदर करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. परिसरात स्वच्छता मोहीम राबवून उद्यानातील कचरा साफ करण्यात आला.
