• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

पारनेर मधील भोंदू बाबाच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यासाठी नार्को टेस्टची मागणी

ByMirror

Mar 18, 2026
पारनेर मधील भोंदू बाबाच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यासाठी नार्को टेस्टची मागणी

कारवाई न झाल्यास अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे बेमुदत उपोषण

अत्याचार प्रकरणातील आरोपीवर गंभीर आरोप; नाव बदलून अनेक वर्षे वास्तव्य

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे संस्था चालवणाऱ्या भोंदू बाबाच्या गंभीर गुन्ह्यांचा तपास सखोल करण्यासाठी त्याची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले असून, आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास 20 मार्चपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ग्रामस्थांसह बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
समितीने दिलेल्या निवेदनानुसार, पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था, ढवळपुरी (ता. पारनेर) चालवणारा यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) या भोंदू बाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपीने पिडीत कुटुंबाशी विश्‍वासाचे संबंध निर्माण करून त्यांच्या मुलीवर दीर्घकाळ अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे.


विशेष म्हणजे, आरोपीने आपले खरे नाव लपवून दुसऱ्या नावाने सन 2021 पासून ढवळपुरी परिसरात वास्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक कुटुंबांशी संबंध प्रस्थापित करून त्याने विश्‍वास संपादन केला. फिर्यादी युवकही त्या संस्थेत सचिव म्हणून कार्यरत असल्याने आरोपीशी त्याचे घरगुती संबंध निर्माण झाले होते. या विश्‍वासाचा गैरफायदा घेत आरोपीने फिर्यादीच्या बहिणीवर अत्याचार केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, आरोपीचे अनेक विवाह झाल्याच्या चर्चा असून, त्याच्या आमिषाला काही महिलाही बळी पडल्याचे सांगण्यात आले आहे. पिडितेला “मी दोन हाफ मर्डर केले आहेत” अशी धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोपही समोर आला आहे. त्यामुळे आरोपीने यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे केले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


वारकरी संप्रदायाचे सोंग घेऊन अशा प्रकारचे गैरकृत्य करणे ही अत्यंत निंदनीय बाब असून, यामुळे संप्रदायाला काळिमा फासला गेल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोपीच्या पूर्वीच्या गुन्ह्यांचा तपास लागण्यासाठी नार्को टेस्ट आवश्‍यक असल्याचे समितीचे म्हणणे आहे.


यासोबतच आरोपीचे बँक खाते गोठवून त्याची ढवळपुरी येथील मालमत्ता जप्त करून शासन जमा करण्याची मागणीही करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात आठ दिवसांत कारवाई न झाल्यास ग्रामस्थांसह बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *