• Mon. Mar 16th, 2026

आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्डियाक सेंटर रुग्णांसाठी नवसंजीवनी -संजय राका

ByMirror

Mar 16, 2026

राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्या स्मृतिदिनानिमित्त हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


108 रुग्णांची तपासणी; अल्पदरात होणार शस्त्रक्रिया

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सध्या सर्वच वयोगटांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून अनेक वेळा चालता-बोलता व्यक्तीचा अचानक मृत्यू होत असल्याच्या घटना वाढत आहेत. अशा परिस्थितीत तत्पर व उच्च दर्जाची सेवा देणारे आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्डियाक सेंटर रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत असल्याचे प्रतिपादन संजय राका यांनी केले. वाढत्या हृदयविकाराच्या पार्श्‍वभूमीवर समाजाची गरज ओळखून हॉस्पिटलमार्फत सुरु असलेली उत्कृष्ट आरोग्यसेवा देशभरात नावाजली गेल्याचे त्यांनी सांगितले.


जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्या 34 व्या स्मृतिदिनानिमित्त श्रीमती बिजयाबाई मोहनलालजी राका परिवाराच्या वतीने आयोजित हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संजय राका, भारती राका, चंद्रकांत राका, अनिता राका, किरण राका, प्रितम राका, गौरव राका, सोनम राका, प्रिंकेश राका, दिव्यानी राका, अमोल राका, कोमल राका, शुभम राका, सायली राका, सौरभ राका, आदेश राका, ऐश्‍वर्या राका, रियान राका, मायरा राका, संतोष बोथरा, सुभाष मुनोत, महेंद्र कांकरिया, वसंत चोपडा, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, कार्डिओलॉजिस्ट डॉ. राहुल अग्रवाल, डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. विनय छल्लाणी आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी सांगितले की, दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा मिळत असल्यामुळे देशभरातून रुग्ण आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत आहेत. हॉस्पिटलच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून सेवाभावाने रुग्णसेवा सुरू आहे. औषधांसोबतच आचार्यजींच्या आशीर्वादाची दुवा मिळत असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळतो. हॉस्पिटलचे हार्ट सर्जरी सेंटर देशभरात नावाजले गेले असून आतापर्यंत 25 हजारांहून अधिक बायपास सर्जरी, 50 हजारांपेक्षा जास्त अँजिओप्लास्टी आणि 1 लाखाहून अधिक अँजिओग्राफी यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. याशिवाय लहान मुलांच्या 8 हजारांहून अधिक हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. पूर्वी महाराष्ट्रात हृदय शस्त्रक्रियेची केंद्रे कमी होती आणि त्याचा खर्चही सर्वसामान्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे समाजाची गरज लक्षात घेऊन या हॉस्पिटलमध्ये कार्डियाक सेंटर उभारण्यात आले. या विभागाचे आत्मा व हृदय असलेले डॉ. वसंत कटारिया यांच्या नेतृत्वाखाली या सेंटरने देशभरात नावलौकिक मिळवला आहे, असे त्यांनी नमूद केले.


सोनम राका म्हणाल्या की, वर्षभरात विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करून आनंदऋषीजी हॉस्पिटलमार्फत गरीब व गरजू नागरिकांना उपचाराची संधी दिली जाते. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या आरोग्य मंदिरातून होत आहे. या सामाजिक कार्यात राका परिवाराला सहभागी होण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी भाग्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्डिओलॉजिस्ट डॉ. राहुल अग्रवाल यांनी सांगितले की, हॉस्पिटलमध्ये अल्पदरात सेवा देताना उपचाराच्या दर्जावर कोणतीही तडजोड केली जात नाही. रुग्णांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि आयातीत साधनांचा वापर केला जातो. बायपास सर्जरी, हृदयातील झडप बदलणे, हृदयातील छिद्र बुजविणे, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी यांसारख्या शस्त्रक्रिया अल्पदरात केल्या जातात. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अनेक शस्त्रक्रिया मोफतही केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात एकूण 108 रुग्णांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले, तर आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *