• Sun. Mar 15th, 2026

सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना ‘कस्तुरबा गांधी समाजसेवा पुरस्कार जाहीर

ByMirror

Mar 15, 2026

जळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान


तीन दशकांपासून समाजातील वंचित घटकांसाठीच्या कार्याची दखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्त्या, साहित्यिक व मुक्त पत्रकार सरोज आल्हाट यांची राज्यस्तरीय ‘श्रीमती कस्तुरबा गांधी समाजसेवा पुरस्कार 2026’ साठी निवड करण्यात आली आहे. जळगाव येथील तुबा नाज हेल्प मल्टीपर्पज सोसायटीतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे वितरण 29 मार्च रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. जावेद शेख यांनी दिली आहे.

सरोज आल्हाट गेल्या सुमारे 30 वर्षांपासून विविध सामाजिक संस्थांमधून पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. समाजातील दलित, शोषित, दारिद्य्रग्रस्त, आदिवासी, बालकल्याण, परित्यक्ता महिला, युवकांचे प्रश्‍न, एड्सग्रस्त रुग्ण, कुष्ठरुग्ण, अंध तसेच इतर वंचित घटकांसाठी त्यांनी सातत्याने सामाजिक, विकासात्मक आणि धोरणात्मक स्तरावर काम केले आहे.


त्यांच्या ‘गार्डियन एंजल्स’ या संस्थेमार्फत परावलंबी व दुर्धर आजारांनी पीडित रुग्ण तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवा उपक्रम राबवले जातात. या संस्थेमार्फत गरजू रुग्णांना आधार देण्याबरोबरच त्यांची वैयक्तिक काळजी, आरोग्यविषयक मदत आणि मानसिक आधार देण्याचे कार्यही केले जाते. याशिवाय त्यांच्या ‘द म्युझिकल मूड्स’ या ग्रुपच्या माध्यमातून रुग्णांना डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी मोफत म्युझिक थेरेपी दिली जाते. या उपक्रमामुळे अनेक रुग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण होऊन त्यांच्यात नव्याने जगण्याची उमेद निर्माण होत असल्याचे सांगितले जाते.

गार्डियन एंजल्स संस्थेमार्फत समाजातील गरीब, परित्यक्ता, एकल विधवा महिला तसेच युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. या माध्यमातून अर्धांगवायू, कॅन्सर, पार्किन्सनसह विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांची वैयक्तिक स्वच्छता, दैनंदिन क्रिया, व्यायाम आणि इतर आवश्‍यक सेवांमध्ये मदत केली जाते.


सरोज आल्हाट स्वतःही रुग्णसेवेत सक्रिय सहभाग घेतात. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशन, मानसिक आधार तसेच सकारात्मक विचारांची दिशा देण्याचे कार्य त्या सातत्याने करतात. त्यांच्या ‘डोरकास रिजूविनेशन प्रोग्रॅम’च्या माध्यमातूनही गरजू व्यक्तींना वैयक्तिक पातळीवर मदत केली जाते. त्यांच्या या व्यापक सामाजिक कार्याची दखल घेऊनच त्यांची राज्यस्तरीय कस्तुरबा गांधी समाजसेवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे. यापूर्वीही सरोज आल्हाट यांना सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *