माझी शाळा-माझे अबॅकस वेबपेज चे प्रकाशन व उत्कृष्ट शिक्षिकांचा सन्मान
“गणिताचे भविष्य घडविणारा उपक्रम” -आनंद भंडारी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शिक्षण विभाग, अहिल्यानगर आणि एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना मोफत अबॅकस शिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गणितीय क्षमतेचा विकास, मानसिक गणनशक्ती वृद्धिंगत करणे आणि तार्किक विचारक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी “माझी शाळा-माझे अबॅकस” उपक्रमाचा समारोप नुकताच जिल्हा परिषद मुख्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादा भाऊ गुंजाळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, अकॅडमीच्या मार्गदर्शिका डॉ. कल्पना अशोक घडेकर, दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक डॉ अमोल बागुल यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीची माहिती देणाऱ्या विशेष वेबपेजचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये अबॅकस प्रशिक्षण प्रभावीपणे राबविणाऱ्या उत्कृष्ट अबॅकस शिक्षिका सौ.सुवर्णा ठोकळ यांचा सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे वृक्ष देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शिक्षिका स्वाती रेपाळे अंकिता सानप आदी उपस्थित होत्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले की,”ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत अबॅकससारखे आधुनिक गणितीय शिक्षण पोहोचविणे ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती, तार्किक विचार आणि मानसिक गणन क्षमता विकसित करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरला आहे. येणाऱ्या पिढ्यांचे गणितीय भविष्य घडविणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन जिल्हा परिषद शाळांमध्ये सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, बौद्धिक विकास आणि कौशल्याधारित अध्यापनाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही हा उपक्रम आदर्श ठरणार असल्याचे मत शिक्षणाधिकारी पाटील यांनी व्यक्त केले.

