शेवगावमधील शेतकरी महिलेला मारहाण प्रकरण; आरोपींवर कठोर कारवार्इची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील जुने दहिफळ येथील शेतकरी महिला सौ. हिराबाई लक्ष्मण भारस्कर यांना जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात अखेर तब्बल 20 दिवसांनंतर आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानवी हक्क अभियानच्या वतीने करण्यात आलेले उपोषण, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि न्यायासाठी उभारलेला संघर्ष यामुळेच ही कारवाई शक्य झाल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
सोमवारी (दि. 22 जून) शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर फिर्यादी महिला तसेच मानवी हक्क अभियानच्या पदाधिकाऱ्यांना गुन्हा दाखल झाल्याची प्रत अधिकृतरित्या देण्यात आली. या प्रकरणी मानवी हक्क अभियानचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत डोलारे, जिल्हा संघटक अशोकराव भोसले, जिल्हाध्यक्ष लखन साळवे, जिल्हा सचिव सहदेव चव्हाण आणि जिल्हा सल्लागार गोविंद सातपुते यांनी पुढाकार घेतला होता. पीडित महिलेला न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई व्हावी यासाठी शेवगाव तहसील कार्यालयासमोर कुटुंबीयांसह उपोषण करण्यात आले होते. तसेच स्थानिक पोलीस प्रशासन, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.
फिर्यादी सौ. हिराबाई भारस्कर या जुने दहिफळ येथील रहिवासी असून त्यांचे कुटुंब शेती व्यवसायावर उदरनिर्वाह करते. गट क्रमांक 39 मधील 40 गुंठे जमीन ही त्यांच्या सासऱ्यांच्या नावावर होती. संबंधित जमिनीच्या मालकी आणि वाटपाबाबत न्यायालयात दावा प्रलंबित असताना जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीनुसार, 2 जून 2026 रोजी दुपारी त्या आपल्या कुटुंबीयांसह शेतात काम करत असताना काही व्यक्ती तेथे आल्या. जमिनीवरून वाद घालत त्यांनी जागा खाली करण्याची मागणी केली. यावेळी शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करण्यात आली. फिर्यादीला तसेच त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच शेतातील बाजरी, भुईमूग व जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान करण्यात आले. ट्रॅक्टर फिरवून पिकांची हानी केली तसेच पाईपलाईन फोडल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या हिराबाई भारस्कर यांनी उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटना घडल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल न झाल्यामुळे मानवी हक्क अभियानने आक्रमक भूमिका घेतली होती. फिर्यादी महिला वारंवार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्या, मात्र त्यांची दखल घेतली गेली नाही. यानंतर संघटनेच्या माध्यमातून उपोषण, निवेदने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर पोलिसांनी रविंद्र प्रकाश सकट, सुलभा रविंद्र सकट, अनिल अशोक सरोदे, सुनिता चांदणे, रेश्मा गायकवाड, महेश लालजरे, आकाश राऊत, बाजीराव साहेबराव शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गरीब, शेतकरी आणि वंचित घटकांवरील अन्यायाविरुद्ध मानवी हक्क अभियान पुढेही संघर्ष करणार असून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे.या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
–
हिराबाई भारस्कर या शेतकरी महिलेला मारहाणीची घटना घडूनही गुन्हा दाखल होत नव्हता. आरोपी वकील असल्याने पोलीसांवर दबाव होता. पीडित कुटुंब न्यायासाठी दरवाजे ठोठावत होते, पण त्यांना न्याय मिळत नव्हता. अशा वेळी मानवी हक्क अभियानने या लढ्याची जबाबदारी स्वीकारली. लोकशाही मार्गाने संघर्ष उभारला. अखेर 20 दिवसांच्या सातत्यपूर्ण लढ्यानंतर आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हा विजय अन्यायाविरोधात लढणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाचा आहे. -चंद्रकांत डोलारे (जिल्हा कार्याध्यक्ष, मानवी हक्क अभियान)

