रेटिनाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी
आज महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला -जालिंदर बोरुडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आयुष्यातील दीर्घकाळ अंधार अनुभवलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या जीवनात पुन्हा प्रकाश फुलवण्याचे मोलाचे कार्य फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून घडले आहे. 20 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात एका डोळ्याची दृष्टी गमावलेली आणि दुसऱ्या डोळ्यात काही वर्षांपासून गंभीर दृष्टीदोष निर्माण झाल्यामुळे पूर्णपणे अंधत्व आलेल्या पाटोदा (ता. आष्टी, जि. बीड) येथील 71 वर्षीय सरुबाई कांबळे यांच्यावर रेटिनाची अवघड शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा दृष्टी मिळवून देण्यात आली.

बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाटोदा गावातील सरुबाई कांबळे या साध्या कुटुंबातील आहेत. सुमारे 20 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात त्यांचा एक डोळा कायमचा गमावला गेला होता. दुसऱ्या डोळ्यालाही काही वर्षांपासून गंभीर दृष्टीदोष निर्माण झाला. परिणामी दोन्ही डोळ्यांनी दिसेनासे झाल्यामुळे त्यांचे जीवन पूर्णपणे अंधारमय झाले होते.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने डोळ्यांवर होणारी महागडी आणि अवघड शस्त्रक्रिया करणे त्यांच्या कुटुंबासाठी शक्य नव्हते. रेटिनाशी संबंधित शस्त्रक्रिया जटिल आणि खर्चिक असल्याने अनेक डॉक्टरांनी मोठा खर्च करावा लागेल आणि दृष्टी परत येईल याची खात्री देता येणार नाही, असे सांगितले होते. त्यामुळे कांबळे कुटुंब मोठ्या अडचणीत सापडले होते.
दरम्यान, नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराची माहिती त्यांना मिळाली. या शिबिरात सरुबाई कांबळे सहभागी झाल्या आणि त्यांनी फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांची भेट घेऊन आपली संपूर्ण परिस्थिती सांगितली.
बोरुडे यांनी त्यांच्या अडचणीची गांभीर्याने दखल घेत तात्काळ वैद्यकीय तज्ज्ञांशी संपर्क साधला आणि पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील के. के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली. पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी कांबळे यांच्या डोळ्याची तपासणी करून एका डोळ्यावर रेटिनाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली. या शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या जीवनातील दीर्घकाळचा अंधकार दूर झाला आणि त्यांना पुन्हा दृष्टी मिळाली.
शस्त्रक्रियेनंतर कांबळे नगर शहरात परतल्यानंतर जालिंदर बोरुडे त्यांचे स्वागत करण्यासाठी आले होते. त्या वेळी भावुक झालेल्या कांबळे यांनी बोरुडे यांना कवटाळून घेतले आणि डोक्यावर हात ठेवून मायेने आशीर्वाद दिले. या भावनिक क्षणाने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नियमितपणे मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन केले जाते. या उपक्रमातून अनेक दीनदुबळे, कामगारवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोफत उपचार मिळून नवदृष्टी मिळत आहे. नुकतेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातून सरुबाई कांबळे यांना पुन्हा दृष्टी मिळाल्याने महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा झाल्याची भावना जालिंदर बोरुडे यांनी व्यक्त केली.
