वन व महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; स्थानिक नागरिकांची कारवार्इची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील मौजे चिचोंडी पाटील येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सॉमिल या लाकूड कापणी मशीनविरोधात परिसरातील नागरिकांनी गंभीर तक्रार केली असून शासकीय जागेवरील अतिक्रमण, विनापरवाना लाकूड साठा, पर्यावरणीय प्रदूषण तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तातडीने संयुक्त चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. याबाबत निवेदनाद्वारे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, उपवनसंरक्षक व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित सॉमिल चालक यांनी अंदाजे 6 ते 7 गुंठे शासकीय जागेवर अनेक वर्षांपासून ताबा ठोकून लाकूड कापणीचा व्यवसाय सुरू ठेवला असल्याचा आरोप आहे. या जागेसंदर्भात कोणताही वैध भाडेपट्टा, शासकीय परवानगी किंवा महसूल विभागाची अधिकृत मंजुरी नसताना व्यवसाय सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीकडे केवळ 1 गुंठ्याची पट्टी भरली जात असल्याचा दावा केला जात असला तरी उर्वरित जागेचा वापर विनामोबदला केल्याचा आरोप आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या सॉमिलमध्ये सागवान, आंबा, चिंच, लिंब, बोर यांसारख्या झाडांचे मोठ्या प्रमाणावर लाकूड कापले जात असून परिसरात सध्या दोन ते तीन ट्रकभर लाकडाचा साठा असल्याचे सांगितले जाते. या लाकडासाठी वन विभागाचा वैध कापणी परवाना किंवा वाहतूक पास उपलब्ध आहे का?, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळे वन विभागाने तातडीने तपासणी करून लाकूड जप्त करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तसेच या ठिकाणी शासकीय जागेवर चार शटर व दोन मोठे गाळे उभारून ते भाड्याने देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय लाकूड कापणीसाठी मोठे शेड तसेच पिठाची गिरणी देखील उभारण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शासकीय जागेवर अनधिकृत बांधकामे उभी राहत असताना महसूल विभागाकडून कारवाई का होत नाही? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
परिसरातील नागरिकांच्या मते, सॉमिलमधील लाकूड कापणी मशीन दिवस-रात्र सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी व वायू प्रदूषण होत आहे. लाकडी भुस्सामुळे श्वसनाचे तसेच कानासंबंधी आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय सॉमिल परिसरात अग्निशमन यंत्रणा, सुरक्षा साधने, शौचालय, कार्यालय किंवा ग्राहकांसाठी बसण्याची व्यवस्था नसल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. मशीनला कोणतेही कंम्पाउंड नसून अधिकृत नावाचा फलक देखील लावलेला नाही, त्यामुळे संपूर्ण व्यवसाय अनधिकृत पद्धतीने सुरू असल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या ठिकाणी 10 ते 12 परराज्यातील कामगार काम करत असल्याची माहिती असून त्यांची स्थानिक पोलिसांकडे पडताळणी झालेली आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा देखील निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार, वन विभाग, महसूल विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त तपासणी करून विनापरवाना लाकूड साठा जप्त करावा, शासकीय जागेवरील अतिक्रमण हटवावे व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सदर सॉमिल गावाच्या हद्दीत असल्यामुळे ती शासकीय नियमांनुसार गावाबाहेर स्थलांतरित करावी व रोजगाराच्या संधी देताना स्थानिक बेरोजगार तरुणांना प्राधान्य द्यावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
परिसरातील नागरिकांच्या मते, हा प्रकार शासकीय जमिनीचा संभाव्य अपहार, वनसंपत्तीचा अनधिकृत वापर व पर्यावरणीय हानी दर्शवणारा असल्याने वन व महसूल विभागाने तातडीने कारवाई करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
