• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीने महिला शिक्षिकांचा गौरव

ByMirror

Mar 12, 2026
एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीने महिला शिक्षिकांचा गौरव

महिला दिनचा उपक्रम; सन्मान, मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला सोहळा


स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नसून, ती समाज परिवर्तनाची शक्ती -डॉ. कल्पना घडेकर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. अकॅडमीच्या विविध केंद्रांमधील महिला शिक्षिका मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी एकत्र आल्या होत्या. महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच सामाजिक जाणीवा, परस्पर सहकार्य आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योती मोरे या होत्या, तर एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या मार्गदर्शक डॉ. कल्पना घडेकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते अकॅडमीतील महिला शिक्षिकांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.


या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख अतिथी डॉ. कल्पना घडेकर यांनी महिलांना त्यांच्या अंतर्गत शक्तीची जाणीव करून दिली. महिलांनी आपल्या क्षमतेवर विश्‍वास ठेवत स्वतःचे हक्क धैर्याने मागितले पाहिजेत आणि त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. महिलांनी समाजात पुढे येऊन नेतृत्वाची भूमिका स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
त्याचबरोबर भारतीय संस्कृती, परंपरा आणि सामाजिक मूल्यांचे जतन करण्याची जबाबदारीही महिलांनी तितक्याच ताकदीने पेलणे आवश्‍यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. समाजातील स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नसून ती समाज परिवर्तनाची शक्ती आहे. शिक्षण, आत्मविश्‍वास आणि ध्येयवेड यामुळे महिलांना कोणतीही उंची गाठता येते, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
ज्योती मोरे म्हणाल्या की, महिला दिन हा केवळ उत्सव नसून महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेण्याचा आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. शिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद मिळवली आहे. एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून महिलांना प्रगतीची संधी देत त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.


कार्यक्रमात काही यशस्वी शिक्षिकांनी आपल्या जीवनातील संघर्षमय प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले. सुरुवातीच्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत शिक्षक म्हणून त्यांनी मिळवलेले यश, विद्यार्थ्यांच्या प्रगतीमुळे मिळणारा आनंद आणि आत्मविश्‍वास याबद्दल त्यांनी अनुभव कथन केले. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांमुळे उपस्थित महिलांना सकारात्मक ऊर्जा मिळाली.
या संवादातून महिलांनी एकमेकींना मैत्रिणीप्रमाणे साथ देण्याची भावना व्यक्त केली. परस्परांच्या अडचणी समजून घेत एकमेकींना आधार देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. महिलांमध्ये ऐक्य, सहकार्य आणि आत्मविश्‍वास निर्माण करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.


दुपारच्या सत्रात विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये महिलांनी स्वसंरक्षण, बालविवाह, स्त्री भ्रूणहत्या तसेच स्त्री-पुरुष समानता यांसारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांवर प्रभावी सादरीकरण केले. या सादरीकरणांमधून समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला आणि महिलांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव अधोरेखित करण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *