• Tue. Mar 10th, 2026

प्रयास ग्रुपच्या महिला दिन सोहळ्यात स्त्रीशक्तीचा जागर

ByMirror

Mar 10, 2026

राजमाता जिजाऊ, राणी पद्मावती यांच्या वेशभूषेत महिलांनी रंगविला शौर्याचा इतिहास; स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व बौद्धिक उपक्रमांतून महिलांचा उत्स्फूर्त सहभाग


कुटुंबाच्या मजबूत पायासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची -गीतांजली काळे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रयास ग्रुपच्या वतीने आयोजित महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमात कर्तृत्ववान व थोर महिलांच्या वेशभूषेत अवतरलेल्या सहभागी महिलांनी स्त्रीशक्तीचे प्रेरणादायी दर्शन घडविले. राजमाता जिजाऊ, राणी पद्मावती, राणी लक्ष्मीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांसारख्या इतिहासातील महान स्त्रियांच्या वेशभूषेत आलेल्या महिलांनी कार्यक्रमात इतिहास जिवंत करत उपस्थितांना स्त्रीशक्तीची जाणीव करून दिली. या अनोख्या उपक्रमामुळे महिला दिनाच्या कार्यक्रमाला विशेष रंगत आली होती.


या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेविका गीतांजली काळे, गीता परिवाराच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या हेमा सारडा, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी, सल्लागार विद्या बडवे, संस्थापिका अध्यक्षा अलकाताई मुंदडा, खजिनदार मेघना मुनोत, सचिव हिरा शहापुरे, सोनल थोरात, दीपा सोनी, सोनी पुरनाळे, कविता शिंगवी, सविता धामट, संगीता दंडवाणी, हेमा पडोळे, पूर्वा एरंडे आदी उपस्थित होत्या.


नगरसेविका गीतांजली काळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिलांवर कुटुंबाच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते. आई, पत्नी, मुलगी अशा विविध नात्यांमधून महिला कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य करतात. मुलांमध्ये चांगले संस्कार रुजविणे, कुटुंबातील परस्पर सुसंवाद टिकविणे आणि समाजात सकारात्मक मूल्ये निर्माण करणे हे महिलांमुळेच शक्य होते. आज महिलांनी शिक्षण, उद्योग, राजकारण, सामाजिक क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांत यश संपादन केले असले तरी कुटुंब व्यवस्थेचा पाया मजबूत ठेवण्याची भूमिका देखील त्यांनी सक्षमपणे निभावली पाहिजे. महिलांनी आत्मविश्‍वासाने पुढे जात समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


गीता परिवाराच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या हेमा सारडा यांनी “महिलांनी कुटुंबाचा पाया भक्कम ठेवण्यासाठी काय केले पाहिजे?” या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, कुटुंबामध्ये प्रेम, विश्‍वास आणि संवाद यांना सर्वाधिक महत्त्व असते. महिलांनी संयम, समजूतदारपणा आणि सकारात्मक विचारांनी कुटुंबाला एकत्र ठेवण्याचे कार्य करावे. मुलांमध्ये चांगले संस्कार, प्रामाणिकपणा आणि समाजाभिमुखता रुजविणे ही प्रत्येक आईची जबाबदारी आहे. तसेच महिलांनी स्वतःच्या क्षमतांवर विश्‍वास ठेवून समाजात सक्रिय सहभाग घ्यावा. कुटुंब आणि समाज यांच्यात समतोल राखत महिलांनी आपली भूमिका सक्षमपणे पार पाडली तर सशक्त समाज आणि सशक्त राष्ट्र घडू शकते, असे त्यांनी सांगितले.


यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात महिलांसाठी मनोरंजनात्मक तसेच बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. दीपा मालू यांनी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून कार्यक्रमात रंगत आणली. स्पर्धेतील विजेत्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. तसेच सोडत पद्धतीने निवड झालेल्या भाग्यवान महिलांनाही आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.


कार्यक्रमातील आकर्षण ठरलेल्या कर्तृत्ववान व थोर महिलांच्या वेशभूषा स्पर्धेत जिजामातेच्या भूमिकेत निकिता बायड, राणी पद्मावतीच्या भूमिकेत मनीषा पवार आणि राणी तारामतीच्या भूमिकेत कीर्ती काळे यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली. त्यांच्या प्रभावी भूमिकांसाठी त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले, तर आभार सोनल थोरात यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उज्वला मालू व सरला जाकोटीया यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *