• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

जीनियस ग्लोबल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

ByMirror

Mar 6, 2026
चिमुकल्यांच्या नृत्य-गीतांच्या बहारदार सादरीकरणाने पालक मंत्रमुग्ध

चिमुकल्यांच्या नृत्य-गीतांच्या बहारदार सादरीकरणाने पालक मंत्रमुग्ध


सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास वाढतो -महापौर ज्योतीताई गाडे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग, कजबे मळा येथील जीनियस ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व जल्लोषात पार पडले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. नृत्य, देशभक्तीपर गीते, समूह नृत्य, अभिनय आणि विविध कलागुणांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्‍वासपूर्ण सादरीकरणाला उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.


कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर ज्योतीताई गाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका सौ. शारदाताई ढवण, जीनियस ग्लोबल स्कूलचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, इंजिनिअर डी. आर. शेंडगे, सेक्रेटरी पूजाताई कजबे, उपाध्यक्ष सानप, खजिनदार पांडुरंग गवळी, बाळासाहेब कजबे, राहुल कजबे, अश्‍विनी शेंडगे, उषा शेंडगे, शांताराम कजबे, सहसंचालक जगदीश देशमुख तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी आणि शहरातील विविध प्री-प्रायमरी स्कूलचे संचालक उपस्थित होते.


संस्थेचे सहसंचालक महेंद्र म्हसे यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने शिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केवळ शैक्षणिक गुणवत्ताच नव्हे तर क्रीडा, कला, संस्कृती आणि व्यक्तिमत्त्व विकास यावरही विशेष भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेचे सहसंचालक जगदीश देशमुख यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने व क्रीडा शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण दिले जात असल्याची माहिती दिली.


महापौर ज्योतीताई गाडे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करताना अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास वाढतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असे सांगितले. शहरातील शैक्षणिक संस्थांनी अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.


संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडगे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेताना गुणवत्तापूर्ण व परवडणाऱ्या शिक्षणाची परंपरा कायम ठेवण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे सांगितले. ग्रामीण व शहर परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत दर्जेदार शिक्षण देण्याचे ध्येय संस्थेने ठेवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


नगरसेविका शारदाताई ढवण यांनी परिसरातील या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये माफक दरात दिल्या जाणाऱ्या दर्जेदार शिक्षणाचे तसेच विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेचे कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती म्हसे व समृद्धी डोमकावळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका उषा मसुरे, योगिता दातीर व पूजा सोळसे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करुन पालक आणि शिक्षकांच्या उपस्थितीत आत्मविश्‍वासाने रंगमंच गाजवला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *