• Tue. Mar 10th, 2026

यशवंती मराठा महिला मंडळाकडून मूकबधिर विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा

ByMirror

Mar 10, 2026

महिला शिक्षकांचा गौरव; विद्यार्थ्यांच्या स्वयंपाकासाठी दोन मोठ्या पातेल्यांची भेट


महिलांनी जागरूक व सशक्त होण्याचे मान्यवरांचे आवाहन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने भिस्तबाग, सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या महिला शिक्षकांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. तसेच वस्तीगृहातील मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक करताना भांड्यांची कमतरता भासत असल्याने मंडळाच्या वतीने दोन मोठ्या पातेल्यांची भेट देण्यात आली.


कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका गीतांजली काळे, शहराध्यक्ष मिरातार्इ बारस्कर, संस्थापिका मायाताई कोल्हे, ग्रामीण शहराध्यक्ष रूपाली ताकटे, नगरसेविका दिपालीताई बारस्कर, डॉ. इंगोले, माजी शहराध्यक्षा आशाताई शिंदे, सुरेखा बारस्कर, उर्मिला वाकळे, सुरेखा बारस्कर, लता भापकर, मंगल शिरसाठ, मंगला देशमुख, आशाताई शिंदे, कल्याणी शेळके, राजश्री शेळके, मंगल काळे, आरती थोरात, सारिका गाडे, रूपाली ताकटे, अर्चना बोरुडे, मीनाक्षी जाधव, मिरा बेरड, वैशाली उत्तेकर, माधवी दांगट, राजश्री पोहेकर, डॉ. संध्या कवडे, लीना नेटके, संजना शेळके आदी महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


नगरसेविका गीतांजली काळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पूर्वीच्या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांवर अन्याय होत होता. महिलांना समान वागणूक आणि सन्मान मिळत नव्हता. अशा परिस्थितीत महिलांनी आंदोलन उभारून आपले हक्क मिळवले. या संघर्षाची आठवण म्हणून दरवर्षी 8 मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले.


डॉ. इंगोले यांनी महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर व गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण ही गंभीर बाब बनत आहे. यासाठी महिलांनी जागरूक होणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. 9 ते 14 वर्षांच्या मुलींना एचपीव्ही व्हॅक्सीन दिले जात असून त्याद्वारे गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच सॅनिटरी पॅडचा योग्य वापर कसा करावा याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.


नगरसेविका दिपालीताई बारस्कर यांनी सांगितले की, मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे महान कार्य या शिक्षिका करत आहेत. प्रत्येकाने जीवनात ध्येय निश्‍चित करून त्यासाठी प्रयत्न करावेत. आज महिला प्रत्येक क्षेत्रात काम करत असल्या तरीही अनेक ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत असल्याची वस्तुस्थिती आहे. मुलींवर बंधने घालण्यापेक्षा मुलांनाही योग्य संस्कार देणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.


सुरेखा बारस्कर यांनी सांगितले की, समाजात वावरताना महिलांना वेळप्रसंगी राणी लक्ष्मीबाईसारखे धैर्य दाखवावे लागते. महिला अबला नसून सबला आहे. या मातीतील महिलांनी वेळप्रसंगी तलवार हाती घेऊन संघर्ष केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे महिलांनी अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


संस्थापिका मायाताई कोल्हे यांनी सांगितले की, महिलांनी आणि मुलींनी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी वाघिणीसारखे व्यक्तिमत्त्व घडवावे. जिजाऊंचा आदर्श घेऊन महिलांनी शिवबाप्रमाणे मुलांवर संस्कार करणे गरजेचे आहे. सशक्त भारत हा महिला सक्षमीकरणातूनच घडू शकतो. प्रत्येक महिलेमध्ये असलेल्या विशेष गुणांना वाव देत छंद जोपासल्यास जीवन अधिक आनंदी होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. किरणतार्इ बारस्कर यांनी देखील महिला शक्तीवर भाष्य करुन उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी जेवण बनविण्यासाठी मोठ्या पातेल्यांची गरज होती. ही गरज ओळखून सुमारे 100 मुलांचे जेवण बनवता येईल अशी दोन मोठी पातेली शाळेला भेट देण्यात आली. यावेळी राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल कवयित्री सारिका गाडे, अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल उद्योजिका मितातार्इ बेरड तसेच शिवजयंती वेशभूषा व पारंपारिक दागिने स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या प्रतिभा भिसे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी नवचैतन्य प्रश्‍नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिरातार्इ बारस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आशाताई शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *