महिला दिनानिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महापौरांना निवेदन
महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार -महापौर ज्योतीताई गाडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील महिला भगिनींसाठी सुसज्ज आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने महापौर ज्योतीताई गाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीची तातडीने दखल घेत, “महिलांच्या आरोग्याशी निगडित असलेला हा प्रश्न आपण प्राधान्याने मार्गी लावू,” असे आश्वासन महापौर सौ. ज्योतीताई गाडे यांनी शिष्टमंडळाला दिले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन शहरातील विविध भागांतील महिलांच्या स्वच्छतागृहाच्या अडचणी मांडल्या. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, जिल्हा सचिव माणिकराव नवसुपे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर म्हैसमाळे, जिल्हा सहसचिव सिकंदर वाकरे आणि शहर अध्यक्ष अतुल देव्हारे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर गाडे यांनी शहरातील महिला भगिनींना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. विशेषतः सावेडी, पाईपलाईन रोड आणि गुलमोहर रोड यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची सोय करण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शवली. तसेच स्वच्छतागृह उभारल्यानंतर त्याचा मेंटेनन्स व्यवस्थित ठेवण्याबाबत सूचनाही दिल्या.
निवेदनात नमूद केल्यानुसार, शहरात कामानिमित्त किंवा व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना स्वच्छतागृहांच्या अभावामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. तासनतास नैसर्गिक विधी रोखून धरल्याने युरिन इन्फेक्शन (UTI) सारखे गंभीर आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून शहरात ‘पिंक टॉयलेट्स’ (Pink Toilets) ही संकल्पना राबवून तिथे सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनची सोय करावी, अशी आग्रही मागणी शिवाजीराव साळवे यांनी केली.
