• Sat. Mar 7th, 2026

प्रयास दादी-नानी ग्रुपकडून महिला दिन उत्साहात; वेशभूषा स्पर्धेतून स्त्री शक्तीचा जागर

ByMirror

Mar 7, 2026

थोर व कर्तृत्ववान महिलांच्या भूमिकांमधून स्त्री शक्तीचा जागर


विविध खेळ, स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांनी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – प्रयास दादी-नानी ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या कार्य-कर्तृत्वाचा जागर करणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात थोर व कर्तृत्ववान महिलांवर आधारित वेशभूषा स्पर्धा, विविध मनोरंजनात्मक आणि बौद्धिक खेळांच्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेत स्त्री शक्तीचे प्रभावी दर्शन घडविले.


कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून भारती सुधीर पाटील, हेमा सारडा, नवनिर्वाचित नगरसेविका संध्या पवार, गौरी बोरकर, माजी नगरसेविका मंगल गुंदेचा, रेणुका शर्मा, सुजाता कदम, शोभा लुनिया, राजश्री शितोळे उपस्थित होत्या. तसेच प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी, सल्लागार विद्या बडवे, संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, खजिनदार मेघना मुनोत, उपाध्यक्ष ज्योती गांधी, सचिव उज्वला बोगावत यांच्यासह अरुणा गोयल, सुचेता बोरकर, छाया भंडारी, सुशीला त्र्यंबके, उषा सोनी, शकुंतला जाधव, अलका वाघ, सुरेखा जंगम, लीला अग्रवाल, नीलिमा पवार, उषा सोनटक्के, शशिकला झरेकर, जयश्री पुरोहित, प्रतिभा पेंडसे, आरती वाडेकर, आशा गायकवाड, कविता शिंगवी, मिनाक्षी पाठक आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिला सक्षमीकरणासाठी प्रयास ग्रुपचे सातत्यपूर्ण कार्य


प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा यांनी प्रयास ग्रुपच्या कार्याचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, मागील अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने प्रयास ग्रुप कार्यरत आहे. महिलांमध्ये आत्मविश्वास वाढावा, त्यांचे आरोग्य चांगले राहावे तसेच त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. आज अनेक महिला या ग्रुपशी जोडल्या गेल्या असून, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्या सक्रिय भूमिका बजावत आहेत.


प्रमुख पाहुण्या भारती सुधीर पाटील यांनी आपल्या भाषणात महिलांना प्रेरणा देताना सांगितले की, प्रत्येकाने वास्तव जीवन जगत असताना मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस ठेवले पाहिजे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. महिलांमध्ये अपार क्षमता आहे. कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे असून त्यांना योग्य संधी मिळाल्यास त्या मोठे यश मिळवू शकतात, असे त्यांनी सांगितले.


हेमा सारडा यांनी मुलगा-मुलगी भेदभावाबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजाने आता हा भेद पूर्णपणे विसरून समानतेची भूमिका स्वीकारली पाहिजे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास अनेक चांगल्या गोष्टी साध्य होऊ शकतात. मोबाईलचे फायदे आणि तोटे समजून घेऊन त्याचा सकारात्मक उपयोग केला तर शिक्षण, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनात मोठी प्रगती करता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.


वेशभूषा स्पर्धेतून इतिहासातील स्त्रियांची झलक
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेली थोर व कर्तृत्वान महिलांवरील वेशभूषा स्पर्धा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. सहभागी महिलांनी विविध ऐतिहासिक व प्रेरणादायी स्त्री व्यक्तिमत्त्वांची वेशभूषा करून एकपात्री नाटिकेद्वारे प्रभावी सादरीकरण केले. शोभा ढेरे यांनी ‘हिरकणी’ची भूमिका तर अलका वाघ यांनी ‘जनाबाई’ची भूमिका उत्कृष्टपणे साकारत उपस्थितांची दाद मिळवली.
याशिवाय महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध मनोरंजनात्मक व बौद्धिक खेळांच्या स्पर्धाही रंगल्या. स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसेच सोडत काढून काही भाग्यवान महिलांनाही बक्षिसे देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी कुश मसाले, पलक ज्वेलर्स आणि सहदेव ज्वेलर्स यांनी बक्षिसांसाठी प्रायोजकत्व दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले तर आभार कविता शिंगवी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दीपा मालू, दीपा सोनी, उज्वला मालू आणि सरला जाकोटीया यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *