• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात

ByMirror

Mar 5, 2026
‘हिरवे ना भगवे, माणुसकीचे रक्त लालच असते’ -प्रा. सुभाष वारे

विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणातून भारताच्या विविध संस्कृतींचे दर्शन


‘हिरवे ना भगवे, माणुसकीचे रक्त लालच असते’ -प्रा. सुभाष वारे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्था संचलित कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. विद्यार्थ्यांनी आषाढीतील दिंडी, कोळीगीत, साउथ इंडियन व काश्‍मिरी गीत तसेच ठसकेदार मराठमोळी लावणी सादर करून भारतातील विविध प्रांतांच्या संस्कृतीचे रंगमय दर्शन घडवले. त्यांच्या आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.


छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष व पराक्रम विद्यार्थ्यांनी रंगमंचावर प्रभावीपणे साकारला. या प्रसंगी सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.


लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष प्रा. सुभाष वारे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, ॲड. रवींद्र शितोळे, जनकल्याण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. शिवाजी विधाते, अनिल साळुंखे,माजी प्राचार्य के.एच. शिंदे, अर्जुनराव पोकळे, संस्थेचे लाईफ मेंबर सदस्य शिवाजी लंके, शब्दगंधचे सचिव सुनील गोसावी, स्कूल कमिटी सदस्य श्‍यामराव व्यवहारे, शेखर व्यवहारे, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर यांनी सांगितले की, शाळा गुणवत्तेच्या बाबतीत आघाडीवर असून अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये शालेय विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत तसेच जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत मोठ्या संख्येने चमकले आहेत. कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांची उल्लेखनीय प्रगती सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.


प्रा. सुभाष वारे आपल्या मनोगतात म्हणाले की, “निसर्गाने प्रत्येकाला माणूस म्हणून जन्म दिला आहे; जाती-धर्म या नंतरच्या उतरंडी आहेत. शिक्षणातून विद्यार्थी ‘माणूस’ म्हणून घडला पाहिजे. हीच आजच्या शिक्षणाची खरी गरज आहे.” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी हालअपेष्टा सहन करून शिक्षणाची दारे बहुजनांसाठी खुली केली. हा वारसा कर्मवीर अण्णा व लक्ष्मीबाई यांनी पुढे चालवला आणि शिक्षणाच्या चळवळीतून बहुजनांची मुले शिकवली, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडून “सगळ्या कळ्या उमलू उद्या… सगळे फुल फुलू द्या!” “रक्त भगवे, हिरवे नसते… माणुसकीचे रक्त फक्त लाल असते!” “ना जातीचे ना धर्माचे, शिवराय सर्व जातीचे!” या घोषणाही दिल्या


ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वाचनातून साहित्याकडे वळावे. वाचनाची आवड निर्माण झाली तर जीवन समृद्ध होते. वह्या खरडणे म्हणजे शिक्षण नव्हे; ज्ञान, बुद्धी आणि माणुसकी शिक्षणातून विकसित व्हावी. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले शिक्षणच स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकवू शकते. शिक्षणात संस्कारांचा अंतर्भाव असावा. मन, मेंदू आणि मनगट सक्षम करणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट असावे. मानवतावादी विचारातून राष्ट्रनिर्मिती झाली पाहिजे, तेव्हाच देश घडेल, असे त्यांनी स्पष्ट केले. शब्दगंधचे सुनील गोसावी यांनी विद्यार्थ्यांना मोठे होण्यासाठी पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला.


गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. मराठी तडका, बॉलीवुड गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. मल्हारी रिमिक्स आणि मराठी रिमिक्सने धमाल उडवली. देशासाठी बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांसाठी सादर करण्यात आलेल्या विशेष गीताने वातावरण देशभक्तीमय झाले. गोंधळ गीताद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम साकारण्यात आला. ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा प्रसंग रंगमंचावर उभा राहताच उपस्थित प्रेक्षक भारावले. पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता दोमल, स्मिता पिसाळ आणि प्रदीप पालवे यांनी केले. आभार शिवाजी लंके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उर्मिला साळुंके, मिनाक्षी खोडदे, रुपाली वाबळे, अमित धामणे, मंगेश कारखिले , जयश्री खांदोडे, शितल रोहोकले, भाग्यश्री लोंढे, भारती राऊत, इंदूमती दरेकर, पुनम घाडगे सोनाली अनभुले, कांचन मदने, रूपाली गाडे, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *