• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगरात महिला उद्योजकतेला चालना देणार -महापौर ज्योतीताई गाडे

ByMirror

Feb 24, 2026
विविध स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगला महिलांचा उत्साह

प्रयास ग्रुपच्या कार्यक्रमात महिलांच्या उद्योगवृद्धीचा संकल्प


विविध स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगला महिलांचा उत्साह

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आजच्या काळात महिला केवळ घरापुरत्या मर्यादित न राहता उद्योग-व्यवसाय, सामाजिक कार्य, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत पुढे जात आहेत. स्वतःच्या कामाचा अभिमान बाळगून प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे उभ्या राहणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयास ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या ग्रुपमुळे विविध क्षेत्रातील महिला एकत्र येऊन एकमेकांशी जोडल्या गेल्या असून त्यांच्या उद्योग-व्यवसायाला चालना मिळत आहे.


प्रयास ग्रुप व दादी-नानी ग्रुपच्या वतीने आयोजित महिलांच्या विशेष कार्यक्रमात नवनिर्वाचित महापौर ज्योतीताई गाडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी बोलताना महापालिकेच्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विशेष सहकार्य करण्याचा व विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. “महिला सक्षम झाल्या तर समाज सक्षम होतो. महिलांना उद्योगासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण व आवश्‍यक सुविधा देण्यासाठी पालिका सकारात्मक भूमिका घेईल,” असे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमास सुप्रिया धनंजय जाधव, नगरसेविका गीतांजली काळे, सविता जाजू, आशा भांड, डॉ. दिपाली भारदे, सुपर्णा देशमुख, ॲड. स्वाती जाधव, रेणुका शर्मा, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी, प्रयास दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, खजिनदार मेघना मुनोत, सचिव हिरा शहापुरे, छाया भंडारी, प्रीती पटवा, सविता धामट, पूर्वा एरंडे, हेमा पडोळे, संगीता घोडके आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


यावेळी सुप्रिया धनंजय जाधव यांनी महिलांनी आत्मविश्‍वासाने पुढे येऊन स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करावे, असे आवाहन केले. नगरसेविका गीतांजली काळे यांनी महिलांनी सर्व समाजाला सोबत घेत प्रगतीचा मार्ग स्वीकारला असून स्वार्थ आणि परमार्थ यांचा समतोल साधत जीवन जगण्याचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे, असे मत व्यक्त केले.


प्रास्ताविकात रजनी भंडारी यांनी प्रयास ग्रुपच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. उद्योग मार्गदर्शन, कौशल्यविकास कार्यशाळा, सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम यांमुळे महिलांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमात महिलांच्या वतीने नवनिर्वाचित महापौर व नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. सोडत पद्धतीने भाग्यवान महिलांनाही आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.


सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरण अधिक रंगतदार झाले. शोभा ढेरे यांनी स्वरचित उखाणा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. दिशा घोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रभावी पोवाडा सादर केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दीपा सोनी, दीपा मालू व सरला जाकोटिया यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले तर आभारप्रदर्शन मेघना मुनोत यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *