• Tue. Feb 24th, 2026

संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त भिंगारमध्ये स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपणाचा उपक्रम

ByMirror

Feb 24, 2026

झाडू हाती घेऊन संतांच्या विचारांना अभिवादन; हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम


संत गाडगे महाराजांनी केवळ उपदेश न देता, कृतीतून सामाजिक बदलाचा संदेश दिला -संजय सपकाळ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरात स्वच्छता अभियान व वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागृतीचा संदेश देत संतांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्यात आले.


संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणप्रसार आणि जनसेवा यांचा वसा जोपासला. “स्वच्छता हीच खरी सेवा” हा त्यांचा संदेश समाजमनात रूजविण्याच्या उद्देशाने हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी प्रत्यक्ष झाडू हाती घेत परिसर स्वच्छ केला. जॉगिंग पार्कमधील प्लास्टिक व इतर कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. यासोबतच वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत स्वच्छतेच्या मोहिमेत सहभाग घेतला. परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प सर्वांनी यावेळी केला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ व अनंत सदलापूर यांच्या हस्ते संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर अविनाश काळे व रमेश वराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात सचिन चोपडा, जहीर सय्यद, दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, अभिजीत सपकाळ, सुंदरराव पाटील, अशोक पराते, दीपकराव धाडगे, मनोहर दरवडे, दिलीप गुगळे, रामभाऊ राऊत, राजकुमार चिंतामणी, सरदारसिंग परदेशी, अविनाश जाधव, सुभाष पेंढुरकर, राजू कांबळे, इंजि. अनिल सोळसे, दिनेश शहापूरकर, जालिंदर अळकुटे, मुन्ना वाघस्कर, दीपक अमृत, जयराम मेहतानी, योगेश चौधरी, योगेश हळगावकर, शिवकुमार पांचारिया, सखाराम अळकुटे, विकास निमसे, अजय खंडागळे, श्रीकांत कदम, दशरथराव मुंडे आदींसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, “संत गाडगे महाराजांनी केवळ उपदेश दिला नाही, तर स्वतः झाडू हाती घेऊन समाजासमोर आदर्श ठेवला. आज आपण त्यांची जयंती केवळ औपचारिक कार्यक्रमाने नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून साजरी करत आहोत. स्वच्छ परिसर म्हणजे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली, तरच सुंदर व सुसंस्कृत समाज घडेल.”


सचिन चोपडा म्हणाले की, “संत गाडगे महाराज हे महान समाजसुधारक होते. स्वच्छता, शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलन या त्रिसूत्रीवर त्यांनी समाजप्रबोधन केले. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे हे केवळ प्रशासनाचे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुपने एकत्र येऊन आदर्श निर्माण केला आहे.”


ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे महाराज म्हणाले की, “संत गाडगे महाराजांचे जीवन म्हणजे स्वच्छतेचा आणि सेवेचा अखंड दीपस्तंभ आहे. त्यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या हातातील झाडू हा केवळ स्वच्छतेचा प्रतीक नव्हता, तर तो समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन होता. स्वच्छता ही केवळ बाह्य स्वरूपाची नसून मन, विचार आणि आचरण यांचीही स्वच्छता तितकीच आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *