• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

जीवनाला दिशा देणाऱ्या ‘आत्मज्ञान’ ग्रंथाचे प्रकाशन

ByMirror

Feb 24, 2026
जीवनाला दिशा देणाऱ्या ‘आत्मज्ञान’ ग्रंथाचे प्रकाशन

मानवी जीवन केवळ भोगासाठी नसून, ज्ञान आणि अध्यात्मासाठी असावे -माधव महाराज कोरे शास्त्री

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जीवनाचा खरा अर्थ उलगडणारे आणि अध्यात्माची वाट दाखविणारे गणराज प्रकाशन प्रकाशित व लेखिका सौ. सुमन अशोक आल्हाट लिखित ‘आत्मज्ञान’ या पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले. नव्या पिढीला स्वतःमधील क्षमता ओळखून विकासाकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करणारा हा ग्रंथ असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
चांदणी चौक येथील संरक्षण लेखा विभाग कम्युनिटी हॉलमध्ये हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. ह.भ.प. गुरुवर्य वेदांतचार्य माधव महाराज कोरे शास्त्री तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष संदीप सांगळे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास लेखिका सौ. सुमन आल्हाट, अशोक आल्हाट, मसाप जिल्हाप्रमुख व गणराज प्रकाशनचे प्रा. गणेश भगत, आकाशवाणी प्रसारण अधिकारी आदिनाथ अननदाते आदी मान्यवर उपस्थित होते.


प्रास्ताविकात प्रा. गणेश भगत यांनी सांगितले की, ‘आत्मज्ञान’ या पुस्तकातून अध्यात्माची सखोल ओळख होत असून आजच्या धकाधकीच्या जीवनात ते नव्या पिढीसाठी प्रकाशवाट ठरणार आहे. लेखिकेने संरक्षण विभागाच्या लेखा विभागात तब्बल 38 वर्षे सेवा बजावली असून, आपल्या आयुष्यातील अनुभव, विचार आणि आत्मिक चिंतन या ग्रंथाद्वारे शब्दबद्ध केले आहे. जीवनातील संघर्ष, आत्मपरीक्षण आणि आध्यात्मिक उन्नती यांचे सुंदर मिश्रण या पुस्तकात आढळते, असे त्यांनी नमूद केले.


लेखिका सौ. सुमन आल्हाट यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जीवनाचा सार या पुस्तकातून उमटला असून, तो वाचकांना आत्मपरीक्षणाची दिशा देईल. प्रत्येकाने आपल्या जीवनातील अनुभवांमधून ज्ञान मिळवून ते समाजासमोर मांडले पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


संदीप सांगळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जेव्हा व्यक्तीला जीवनात व्यक्त व्हावेसे वाटते, तेव्हा ग्रंथनिर्मिती होते. साहित्य आणि समाज हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समाजातील विचार, अनुभव आणि भावविश्‍व साहित्यातून प्रतिबिंबित होते. ‘आत्मज्ञान’ या पुस्तकातून ज्ञानाची धारा समाजापर्यंत पोहोचेल. प्रत्येकाचे जीवन हे एक ग्रंथ असते; ते शब्दातून व्यक्त झाले पाहिजे. ज्ञान आणि अनुभव यांच्या संगमातूनच उत्कृष्ट साहित्यनिर्मिती घडते, असे त्यांनी स्पष्ट केले.व गणराज प्रकाशनाच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचं अभिनंदन केले.


वेदांतचार्य माधव महाराज कोरे शास्त्री म्हणाले की, ग्रंथ मानवजीवनाला दिशा देतात. मानवी जीवन केवळ भोगासाठी नसून, ज्ञान आणि अध्यात्मासाठी असावे. आत्मज्ञान आणि अध्यात्म यांना जीवनात विशेष महत्त्व आहे. या पुस्तकामुळे वाचकांचे जीवन उजळून निघेल आणि त्यांना अंतर्मुख होण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत पालवे यांनी साहित्यातून समाज घडतो, असे नमूद केले. साहित्य जीवनाचा आरसा आहे. प्रगल्भ साहित्य जीवनातील उद्दिष्ट स्पष्ट करते आणि योग्य मार्ग दाखवते. ‘आत्मज्ञान’ हा ग्रंथ जीवनात सकारात्मकता आणि प्रकाश निर्माण करणारा ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


आकाशवाणी प्रसारण अधिकारी आदिनाथ अननदाते यांनी लेखिकेला पुस्तक प्रकाशनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री स्वाती अहिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कवी विनय पिंपरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पल्लवी भोसले, शामा मंडलिक, सचिन आल्हाट, योगेश चांदणे, प्रणित भोसले आणि आनंदराज भगत सखाराम गोरे, अदिराज भगत यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *