राज्यातून मिळाला प्रतिसाद
श्री गुरु तेग बहादूरजींचे कार्य मानवतेला दिशादर्शक -पो.नि. जगदीश भांबळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील श्री गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350 व्या शहिदी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. तारकपूर येथील घर घर लंगर सेवेच्या अन्न छत्रालयात विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या जीवनकार्यावर आधारित ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या अमर त्यागाची, धार्मिक स्वातंत्र्याच्या संदेशाची आणि मानवतेच्या विचारांची जाणीव समाजापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. “धर्मासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान”, “विविधतेतील एकता” आणि “गुरु तेग बहादूरजी यांचे जीवन व संदेश” हे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सुवर्णा दीपक पवार (अहिल्यानगर), द्वितीय पारितोषिक अक्षरा किशोर महाजन (वसमत, जि. हिंगोली) व दुर्गेश किशोर चिलवर (जालना), तर तृतीय पारितोषिक अजितकौर बलजीतसिंग वधवा (अहिल्यानगर) यांनी मिळविले. विजेत्यांना अनुक्रमे ₹2501/-, ₹1501/- आणि ₹501/- अशी रोख बक्षिसे देण्यात आली.
विजेत्या स्पर्धकांना तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या हस्ते बक्षीदे देण्यात आली. यावेळी त्यांनी ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूरजींप्रती आदर व्यक्त करत त्यांचे कार्य मानवतेला दिशादर्शक असल्याचे स्पष्ट केले. तर घर घर लंगर सेवा टीमच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
या उपक्रमासाठी जनक आहुजा, गुलशन कंत्रोड, प्रितपालसिंग धुप्पड, मुन्नासेठ जग्गी, सतीश गंभीर, हरजीतसिंग वधवा, राजेंद्र कंत्रोड, प्रशांत मुनोत, राजू जग्गी, सुनील थोरात, सोमनाथ चिंतामणी, अनीश आहुजा, किशोर रंगलानी, बलजीतसिंग वधवा, दीपक पवार, सौरभ त्रिमुखे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे गुरु तेग बहादूरजींच्या महान त्यागाचा व मानवतेच्या संदेशाचा प्रभावी प्रसार झाला असून, वर्षभर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत अमिता कंत्रोड व सतीश गंभीर यांनी केले. प्रास्ताविकात हरजीतसिंग वधवा यांनी या स्पर्धेची माहिती दिली. आभार जनक आहुजा यांनी मानले.
