• Sat. Feb 21st, 2026

अहिल्यानगरात दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा

ByMirror

Feb 21, 2026

दहावीची परीक्षा म्हणजे भीती नव्हे, पहिली पायरी -प्रा. माणिकराव विधाते


विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढविण्याचा उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षांना आजपासून सुरुवात झाली असून, शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहासोबत थोडेसे दडपणही जाणवत होते. या पार्श्‍वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने रूपीबाई बोरा माध्यमिक विद्यालय येथे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शहर बँकेचे व्हाईस चेअरमन प्रा. माणिकराव विधाते, भूषण भंडारी, प्राचार्य अजय बारगळ, उपप्राचार्य रविकिरण भांड, पर्यवेक्षक विष्णूगिरी अबिल, अंजली देवकर, भाऊसाहेब पुंड, अमोल मेहेत्रे, विनायक चौधरी, संतोष सुसे, सचिन बर्डे, किशोर जेजुरकर, बाळासाहेब गाणी, विवेक गायकवाड, पंडित सर आदींसह शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.


परीक्षेच्या पहिल्याच दिवशी केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देत त्यांना आत्मविश्‍वासाने परीक्षा द्यावी, अशा शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्‍वास दिसून आला. गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावावर मात करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्याचा उपक्रम सुरु आहे.


प्रा. माणिकराव विधाते म्हणाले की, दहावीची बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पहिली महत्त्वाची परीक्षा असते. आतापर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत, ओळखीच्या शिक्षकांच्या देखरेखीखाली परीक्षा दिलेल्या असतात. मात्र बोर्डाच्या परीक्षेसाठी त्यांना इतर शाळेत जावे लागते. तेथे वर्ग, शिक्षक, वातावरण सर्व काही नवीन असते. त्यामुळे त्यांच्या मनात भीती आणि दडपण निर्माण होते. दडपण दूर व्हावे, विद्यार्थ्यांनी आत्मविश्‍वासाने परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठ वर्षांपासून हा शुभेच्छांचा उपक्रम राबविला जात आहे. गुलाबपुष्प देऊन केलेले स्वागत हे केवळ औपचारिक नसून विद्यार्थ्यांच्या मनातील ताण हलका करण्याचा एक छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.


पुढे बोलताना प्रा. विधाते यांनी परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, तर पुढील वाटचालीची सुरुवात आहे. शांत मनाने प्रश्‍नपत्रिका वाचा, वेळेचे नियोजन करा आणि स्वतःवर विश्‍वास ठेवण्याचे आवाहन केले.


यापूर्वीही या उपक्रमांतर्गत सामाजिक जाणीव जपत विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. इयत्ता बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले होते, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचेही फुलांच्या माध्यमातून मनोबल वाढविण्यात आले आहे. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान, महिला दिनानिमित्त महिलांचे स्वागत करून सामाजिक ऋण व्यक्त करण्यात येत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *