• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

पुरातन मूर्तीही ट्रस्टचीच ‘न्यास मालमत्ता’; अंबिका मातेची मूर्ती बदलण्यास न्यायालयाचा नकार

ByMirror

Feb 5, 2026
तज्ज्ञ अहवालांतील मतभेद

देवी भोयरे येथील अंबिका मातेची मूर्ती बदलण्यास पुणे धर्मादाय आयुक्तांची स्थगिती


तज्ज्ञ अहवालांतील मतभेद

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील देवी भोयरे येथील श्री अंबिका मातेच्या पुरातन पंचधातूच्या मूर्तीबाबत सुरू असलेल्या वादावर पुणे विभागाच्या संयुक्त धर्मादाय आयुक्तांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. श्री देवी भोयरे ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी मूर्ती जीर्ण झाल्याचे कारण देत ती बदलण्याचा घेतलेला निर्णय संयुक्त धर्मादाय आयुक्तांनी तूर्तास स्थगित केला आहे. ही मूर्ती ‘न्यास मालमत्ता’ असून तिच्या स्थितीबाबत तज्ज्ञांचे परस्परविरोधी अहवाल सादर झाल्याने तसेच भाविक व ग्रामस्थांचा तीव्र विरोध असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.


श्री देवी भोयरे ट्रस्ट ही महाराष्ट्र सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था अधिनियमांतर्गत नोंदणीकृत संस्था आहे. या मंदिरात 18 ऑगस्ट 1992 रोजी अष्टभुजा स्वरूपातील पंचधातूची मूर्ती विधिवत प्रतिष्ठापित करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ ही मूर्ती श्रद्धेचे केंद्र राहिली आहे. मात्र जानेवारी, फेब्रुवारी 2025 दरम्यान सध्याच्या विश्‍वस्तांनी मूर्तीची पाहणी केली असता ती जीर्ण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.


काही कारागिरांच्या सल्ल्यानुसार मूर्ती पाठीमागून पोकळ झाली असून भविष्यात धोका संभवतो, असे नमूद करत विश्‍वस्तांनी मूर्ती बदलण्याचा ठराव संमत केला. त्यानंतर नवीन मूर्ती तयार करण्यासाठी देणग्या गोळा करण्यासही सुरुवात करण्यात आली. मात्र या निर्णयाला देवी भोयरे गावातील ग्रामस्थ व भाविकांनी तीव्र विरोध दर्शविला.


ग्रामस्थांच्या मते, सध्याची मूर्ती पूर्णतः सुरक्षित असून पूजेसाठी योग्य आहे. त्यांनी स्वतः एका तज्ज्ञ कारागिराकडून मूर्तीची तांत्रिक तपासणी करून घेतली. त्या अहवालात मूर्तीला कोणताही तडा गेलेला नसून ती बदलण्याची आवश्‍यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्थ बाळासाहेब सखाराम मुळे, बटू नामदेव मुळे, अमृत शंकरलाल भंडारी यांच्यासह इतरांनी ट्रस्टचे विश्‍वस्त बाबुराव एकनाथ बेलोते, शिवाजी गोपाळ जाधव, संपतराव देवराम वाळुंज, भाऊसाहेब पोपट सारडे आदींविरुद्ध महाराष्ट्र सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था अधिनियमाच्या कलम 49-ई अंतर्गत पुणे संयुक्त धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतली.


पुणे विभागाचे संयुक्त धर्मादाय आयुक्त-2 राहुल जी. मामू यांच्यासमोर या प्रकरणाची सविस्तर सुनावणी झाली. अर्जदारांच्या वतीने ॲड. जे. के. चौधरी यांनी बाजू मांडताना सांगितले की, विश्‍वस्तांनी ग्रामसभेचा ठराव झाल्याचा दावा केला होता; मात्र ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात असा कोणताही ठराव झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मूर्ती बदलणे म्हणजे ट्रस्टच्या मालमत्तेचे नुकसान होय, असा युक्तिवादही त्यांनी मांडला.


ॲड. चौधरी यांनी सांगितले की, “मूर्ती ट्रस्ट स्थापन होण्यापूर्वीची असली तरी ती ट्रस्टचीच मालमत्ता आहे. या प्रकरणात तज्ज्ञांचे अहवाल परस्परविरोधी असल्याने तिसऱ्या त्रयस्थ आणि निष्पक्ष तज्ज्ञामार्फत तपासणी होणे आवश्‍यक आहे. तोपर्यंत मूर्ती बदलणे योग्य ठरणार नाही.” विश्‍वस्तांच्या वतीने ॲड. जी. बी. गवई यांनी युक्तिवाद करत सांगितले की, मूर्ती बदलण्याचा निर्णय हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घेण्यात आला असून तो ट्रस्ट व भाविकांच्या हितासाठी आहे.


दोन्ही बाजूंचा सखोल विचार केल्यानंतर संयुक्त धर्मादाय आयुक्त राहुल जी. मामू यांनी 23 जानेवारी 2026 रोजी निकाल दिला. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात स्पष्ट केले की, सदर मूर्ती ही ट्रस्टची ‘न्यास मालमत्ता’ आहे. तिच्या स्थितीबाबत दोन परस्परविरोधी तांत्रिक अहवाल उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत मूर्ती बदलल्यास मालमत्तेचे अपरिवर्तनीय नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, जोपर्यंत मूर्तीच्या स्थितीबाबत पूर्ण खात्री होत नाही किंवा न्यायालयाची स्पष्ट परवानगी मिळत नाही, तोपर्यंत मूर्ती हटवण्यास किंवा बदलण्यास विश्‍वस्तांना मनाई करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहेत. श्रद्धेशी निगडित विषयांमध्ये घाईघाईने निर्णय न घेता कायदेशीर प्रक्रिया आणि मालमत्तेचे संरक्षण करणे आवश्‍यक असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले आहे. या निकालामुळे देवी भोयरे येथील ऐतिहासिक व श्रद्धास्थान असलेली अंबिका मातेची मूर्ती तूर्तास तरी मूळ ठिकाणीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *