भिंगारमधील काच, कागद आणि भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप
सामाजिक बांधिलकीतून माणुसकीचा दिवा उजळला
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कोणासाठी दिवाळी म्हणजे रोषणाई, फराळ, नवीन कपडे आणि आनंदाचा उत्सव; तर कोणासाठी दोन वेळच्या अन्नाची भ्रांत मिटविण्याची धडपड! रोज काच, कागद आणि भंगार गोळा करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टकरी कुटुंबांच्या आयुष्यातही दिवाळीचा आनंद फुलावा, त्यांच्या घरातही सणाचा गोडवा निर्माण व्हावा, या संवेदनशील भावनेतून ज्ञानरचना सोशल फाउंडेशनने माणुसकीचा अनोखा दीप प्रज्वलित केला. फाउंडेशनच्या वतीने भिंगार परिसरातील गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ तयार करण्यासाठी आवश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
दिवाळीच्या सणात प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण असते. मात्र, समाजातील काही कुटुंबांना आर्थिक परिस्थितीमुळे सणाचा आनंदही मर्यादित स्वरूपात साजरा करावा लागतो. विशेषतः काच, कागद आणि भंगार संकलित करून मिळणाऱ्या उत्पन्नावर संसाराचा गाडा ओढणाऱ्या कुटुंबांचा संघर्ष मोठा असतो. दिवसभर कष्ट करूनही त्यांच्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कष्टकरी कुटुंबांच्या जगण्यातील संघर्षाची जाणीव ठेवून त्यांच्या दिवाळीत आनंदाचे चार क्षण निर्माण करण्यासाठी ज्ञानरचना सोशल फाउंडेशनने सालाबादप्रमाणे यंदाही हा सामाजिक उपक्रम राबविला.
ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या संचालिका सौ. सुप्रिया चौधरी आणि सारिका शेलार यांच्या हस्ते गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने या कुटुंबांनाही सण साजरा करण्यासाठी मोलाचा आधार मिळाला. मदतीचे स्वरूप केवळ किराणा साहित्यापुरते मर्यादित नसून, समाजातील कष्टकरी घटकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची आणि त्यांच्याप्रती आपुलकी व्यक्त करण्यात आली.
समाजातील गरजू व्यक्तींना मदत करणे म्हणजे केवळ वस्तूंचे वाटप करणे नव्हे, तर त्यांच्या संघर्षाची दखल घेऊन त्यांना आपणही समाजाचा महत्त्वाचा घटक आहोत, ही जाणीव करून देणे होय. कष्टकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलावे, त्यांच्या मुलांनाही दिवाळीचा आनंद अनुभवता यावा आणि त्यांच्या घरातही फराळाचा गोडवा दरवळावा, या भावनेतून फाउंडेशनने पुढाकार घेतला.
ज्ञानरचना सोशल फाउंडेशन मागील चार वर्षांपासून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि वंचित घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. केवळ तात्पुरती मदत करण्यापेक्षा गरजू व्यक्तींना स्वावलंबी बनविणे, त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव देणे, महिलांना सक्षम करणे आणि समाजातील गुणवंतांच्या कार्याला प्रोत्साहन देणे, हा फाउंडेशनच्या कार्याचा मुख्य उद्देश आहे.
याअंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ‘एज्युकेशनल मटेरियल बँक’, महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी ‘महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास’, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी ‘कर्तृत्वाचा सन्मान’, गरजू कुटुंबांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी ‘दिवाळी आनंदोत्सव’, कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘दीपसंध्या’ हा सांस्कृतिक उपक्रम तसेच गरजू आणि वंचित घटकांना मदतीचा हात देणारे विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येतात.

