• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

पाचव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. महावीरसिंग चौहान

ByMirror

Feb 5, 2026
लोककलावंत व शाहीरांच्या सादरीकरणातून लोककलेचे घडणार दर्शन

निमगाव वाघा येथे 19 फेब्रुवारीला रंगणार राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन


लोककलावंत व शाहीरांच्या सादरीकरणातून लोककलेचे घडणार दर्शन


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या 19 फेब्रुवारी रोजी पाचव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे माजी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) संचालक व विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. महावीरसिंग रामचरण चौहान यांची निवड करण्यात आली आहे.


हे संमेलन स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील परिवार मंगल कार्यालयात पार पडणार आहे. या संमेलनात राज्यभरातील ज्येष्ठ व नवोदित साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत सहभागी होणार असून, लोककलावंत व शाहीरांच्या सादरीकरणातून लोककलेचे दर्शन घडणार आहे.


संमेलनाच्या निमित्ताने समाजाच्या विविध क्षेत्रांत निस्वार्थ भावनेने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील साहित्यिक, कवी, लेखक, युवक व लोककलावंतांसाठी हे संमेलन प्रेरणादायी ठरेल, अशी माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे आणि श्री नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे यांनी दिली.


संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले प्रा. डॉ. महावीरसिंग रामचरण चौहान हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांतील कृषी संलग्न महाविद्यालयांचे कला, क्रीडा, सांस्कृतिक व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक (Director of NSS) तसेच संचालक विद्यार्थी कल्याण अधिकारी (Director of Students Welfare) म्हणून कार्यरत होते. त्यांनी एम.एस्सी. (ॲग्री) व पी.एच.डी. पर्यंतचे शिक्षण घेतले असून, 33 वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावली आहे. सध्या ते सॉईल सायन्स व कृषी रसायनशास्त्र विभागात एम.एस्सी. (ॲग्री) व पी.एच.डी. विद्यार्थ्यांना अध्यापन करतात.


शैक्षणिक क्षेत्रासोबतच ते गायक, संगीतकार, कवी व गीतकार असून, त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटातही अभिनय केला आहे. त्यांनी हिंदीत पोवाड्याची रचना व गायन केले असून, त्यांनी लिहिलेली शनीभक्तीगीते सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम व सोनाली वाजपायी यांनी गायिली आहेत. त्यांच्या नावावर पाच पोवाड्यांच्या ऑडिओ कॅसेट्‌स असून, हजाराहून अधिक गीते व कविता त्यांनी लिहिल्या आहेत. ते सर्व प्रकारची वाद्ये वाजवण्यात निष्णात आहेत.


त्यांनी ‘एक रुपया चांदी का’, ‘देश मेरा गांधी का’, ‘आस्था’ या हिंदी चित्रपटांत तसेच ‘लगन’ या मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. ते पाच वेळा अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेले पैलवान असून, एक हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे.


गेल्या 20 वर्षांपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दहा जिल्ह्यांतील वर्ग 1 ते वर्ग 4 समन्वय संघाचे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. ते कृषी विज्ञान प्राध्यापक पतसंस्थेचे संचालक देखील होते. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘राष्ट्रीय सेवा योजना सर्वोत्कृष्ट संचालक’ पुरस्कार (2023-24), अण्णाभाऊ साठे राज्य पुरस्कार (2022-23), केंद्राई भूषण उत्कृष्ट शिक्षण, संशोधन व विस्तार कार्य पुरस्कार (2024-25), तसेच परदेशी समाज भूषण पुरस्कार (2021-22) यांसह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.


या सर्व कार्याची दखल घेत पाचव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीने प्रा. डॉ. महावीरसिंग चौहान यांची अध्यक्षपदी निवड केली असून, त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *