संत रविदास महाराजांचे समतावादी विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा -शिवाजीराव साळवे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराज यांची 649 वी जयंती भोलेनाथ मंदिर, परशुराम खुंट येथे साध्या व श्रद्धापूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यभरात शोककळा पसरली असून, त्या पार्श्वभूमीवर महासंघाने यंदाचा जयंती सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव साळवे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, सुभाषराव भागवत, महिला जिल्हाध्यक्ष मीनाताई गायकवाड, लताताई नेटके, शहर अध्यक्ष अतुल देव्हारे, वधुवर मंडळाचे अध्यक्ष इंजि. शरदराव कांबळे, शशिकलाताई झरेकर, बाबासाहेब लोकरे, विठ्ठलराव जयकर, शहराध्यक्षा पूजा आहेर, मेजर सतीश सूर्यवंशी, बापूसाहेब देवरे, कारभारी चिंधे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब केदारे, पोपटराव बोरुडे, सुभाष झरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव साळवे म्हणाले की, “संत रविदास महाराजांचे समतावादी, मानवतावादी विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. समाजातील पोटजातींनी एकत्र येत संघटित ताकद निर्माण केली पाहिजे. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करून शासनाच्या योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा.”
ते पुढे म्हणाले की, चर्मकार समाज शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती करत असून, त्याचबरोबर सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीही जोपासली पाहिजे. इतर समाज घटकांबरोबर सलोख्याने वागून समाजाचा सकारात्मक ठसा निर्माण होणे गरजेचे आहे. प्रत्येक घटकाला राष्ट्रीय चर्मकार महासंघाशी जोडण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
“संत रविदास महाराजांनी आपल्या वाणीतून समता, बंधुता आणि श्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘मन चंगा तो कठौती में गंगा’ या विचारातून त्यांनी शुद्ध आचरण व अंतःकरणाच्या पवित्रतेचा संदेश दिला. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत,” असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही आपल्या भाषणातून संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत समाजासाठी त्यांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाचे आयोजन अभिनव सूर्यवंशी, प्रतिश सूर्यवंशी, महेश आहेर, सचिन वाघमारे, धनंजय परदेशी, किरण हंकारे, संतोष सूर्यवंशी यांनी केले होते. कार्यक्रमास महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी नगरसेवक दत्ता कावरे, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, परेश लोखंडे, संजू शेठ हंकारे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. अभिनव सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले होते. शेवटी महाप्रसादाच्या वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
