• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाची गाथा सांगणारी चित्रफितचे शहरात प्रक्षेपण

ByMirror

Nov 26, 2025
गुरुद्वारा भाई दया सिंहजी, गोविंदपुरा यांच्या वतीने 350 व्या शहीदी गुरुपर्वाचा उपक्रम

गुरुद्वारा भाई दया सिंहजी, गोविंदपुरा यांच्या वतीने 350 व्या शहीदी गुरुपर्वाचा उपक्रम


प्रोफेसर कॉलनी चौकात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या विचारांचा जागर करुन भाविकांना प्रसाद वाटप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिंद दी चादर म्हणून ओळखले जाणारे शीख समाजाचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी गुरुपर्वानिमित्त अहिल्यानगर शहरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या बलिदानाची आठवण जपली जात आहे. गुरुद्वारा भाई दया सिंहजी, गोविंदपुरा यांच्या वतीने शहरातील प्रमुख चौकांमध्ये गुरुतेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी चित्रफितीचे प्रक्षेपण करत त्यांच्या पवित्र संदेशाचा जागर करण्यात आला.


प्रोफेसर कॉलनी चौकात गुरुतेग बहादूर साहिबजी यांच्या सर्वोच्च बलिदानाची गाथा सांगणारी विशेष चित्रफित दाखविण्यात आली. यामध्ये त्यांनी मानवी अधिकारांचे संरक्षण, धर्मस्वातंत्र्यासाठीचे अढळ भूमिकेचे दर्शन तसेच धर्मांतराच्या दडपशाहीविरोधात दाखविलेल्या अद्वितीय धैर्याचा संदेश अत्यंत प्रभावी पद्धतीने देण्यात आला. ही चित्रफित पाहण्यासाठी नगरकरांनी मोठी गर्दी केली होती आणि त्यातून गुरूंच्या बलिदानाबद्दल आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आली.
गुरुद्वारा समितीचे तसेच शीख समाजाचे अध्यक्ष बलदेवसिंह वाही यांच्या हस्ते चित्रफित प्रदर्शन व प्रसाद वाटप उपक्रमाचा शुभारंभ झाला. या वेळी शीख, पंजाबी, सिंधी समाजबांधवांसह महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


गुरुद्वारा भाई दया सिंहजी, गोविंदपुरा येथे 6 नोव्हेंबरपासून 25 नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात सहज पाठ, श्री अखंड पाठ साहिब, कीर्तन व कथावाचन, यांचा समावेश होता. भाविकांनी या सर्व कार्यक्रमांना मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून गुरुपर्वाचे महत्त्व आणि अध्यात्मिक वातावरणाचा आनंद घेतला. समस्त समाजबांधव आणि गुरुद्वारा समितीच्या संयुक्त पुढाकारातून हा ऐतिहासिक गुरुपर्व अत्यंत श्रध्देने, भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व संगत आणि नागरिकांचे समितीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *