• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

माजी सैनिकांच्या मुला-मुलींच्या लग्नात वीर मातां व वीर पत्नींचा सन्मान

ByMirror

Apr 18, 2025
वेताळ-कचरे कुटुंबाचा आगळावेगळा विवाह सोहळा

गोशाळेला पाणी टाकी, तर ग्रामीण भागातील महिलांना जार भेट; माजी सैनिकांच्या कुटुंबीयांनी जपले सामाजिक भान

वेताळ-कचरे कुटुंबाचा आगळावेगळा विवाह सोहळा

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील माजी सैनिक शिवाजी वेताळ यांची कन्या स्नेहा हिचा विवाह पुणे येथील माजी सैनिक बापूसाहेब कचरे पाटील यांचे चिरंजीव विनीत यांच्यासोबत नगरकल्याण रोडवरील एका कार्यालयात थाटात पार पडला. हा विवाह सोहळा पारंपरिक खर्चिक चालीरीतींपासून दूर राहत, सामाजिक जाणीव आणि देशसेवेच्या भूमिकेतून उपक्रम राबविण्यात आले.


या विवाहाचे विशेष आकर्षण म्हणजे दोन्ही माजी सैनिकांनी पुढाकार घेत समाजातील रूढी परंपरांना फाटा देत जिल्ह्यातील वीर माता आणि वीर पत्नींचा सन्मान करून त्यांना प्रमुख मान दिला. या स्त्रियांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना देशासाठी समर्पित केल्यामुळे त्यांचे योगदान मोठे असल्याचे मत वधू-वर पक्षाने व्यक्त केले.


याशिवाय, विवाह खर्च वळवून मिरी (ता. पाथर्डी) येथील गोशाळेला 2 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी भेट देण्यात आली. महिलांना पारंपरिक साड्या भेट न देता त्याऐवजी ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी उपयोगी पडेल अशा जार वाटप करण्यात आले.


विवाह सोहळ्याला आजी-माजी सैनिक, राजकीय नेते, नगरसेवक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजसेवेच्या आणि जनहिताच्या भावनेने भारलेल्या या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


धनश्री विखे पाटील यांनी या विवाह सोहळ्यास हजेरी लावून वधू-वरांना आशिर्वाद देवून उपक्रमाचे कौतुक केले. विखे पाटील म्हणाल्या की, आजचा हा विवाह केवळ दोन व्यक्तींना नव्हे, तर दोन कुटुंबांना सामाजिकतेच्या धाग्याने जोडणारा आहे. आपल्या कुटुंबाचा आनंद दुसऱ्याच्या सेवेसाठी वळवणं हीच खरी माणुसकी आहे. वीर माता व पत्नींचा सन्मान, गोशाळेला मदत आणि महिलांना उपयुक्त वस्तू देणं या सर्व गोष्टींमधून समाजासाठी एक सकारात्मक संदेश जात असल्याचे त्यांनी सांगितले.


वधूपिता शिवाजी वेताळ म्हणाले की, माझी मुलगी स्नेहा ही एक सैनिक कुटुंबात वाढलेली असून, ती वकील आहे. आम्ही ठरवलं होतं की तिचा विवाह समाजाच्या उपयोगी पडावा. म्हणून हा उपक्रम राबवला. वीर मातांचा सन्मान करणं, जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देणं, आणि महिलांना पाणी साठवण्यासाठी जार देणं हे आमचं कर्तव्य आहे. समाजाने आम्हाला दिलं, आता आम्ही समाजाला परत देत आहोत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *