• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

आरक्षणाची तरतूद डावलून नोकर भरती करणाऱ्या जिल्हा बँक विरोधात वंचितचा शिमगा

ByMirror

Mar 5, 2025
आरक्षणाची तरतूद डावलून नोकर भरती करणाऱ्या जिल्हा बँक विरोधात वंचितचा शिमगा

वंचित बहुजन आघाडीच्या बेमुदत धरणे आंदोलना प्रारंभ; बँके समोर जोरदार निदर्शने

आरक्षणाच्या तरतुदीप्रमाणे नोकर भरती करण्याची मागणी; बँकेचे चेअरमन यांच्या निवासस्थानी भेटीचे आमंत्रण नाकारले

नगर (प्रतिनिधी)- आरक्षणाची तरतूद डावलून अहिल्यानगर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेत होत असलेल्या भरतीला विरोध दर्शविण्यासाठी सोमवार (दि.3 मार्च) पासून जिल्हा बँके समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलना प्रारंभ करण्यात आले. आंदोलकांनी जोरदार निदर्शने करुन, बँकेत आरक्षण डावलून होत असलेल्या भरतीच्या निषेधार्थ बोंबा मारल्या.


या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय सदस्य तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव, राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांच्या प्रमुख उपस्थितीत,जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या अध्यक्षतेखाली, अनिल जाधव, संतोष चोळके, शहराध्यक्ष हनीफ शेख, प्यारेलाल शेख, सुधीर ठोंबे, देविदास भालेराव, प्रसाद भिवसने, मारुती पाटोळे, पोपट शेटे, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, संजय शेलार, महेश पवार, पोपट सरोदे, ॲड. योगेश गुंजाळ, राजीव भिंगारदिवे, लता भांड, अनिता जगधने, पी. के. गवारे, साळवे मॅडम, विठ्ठल माळी, विलास माळी, चंद्रकांत नेटके, प्रवीण ओरे, किरण पाटोळे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जिल्हा सहकारी बँकेच्या जाहीर झालेल्या भरतीमध्ये विविध समाज घटकांच्या आरक्षणाची तरतूदीची अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. सरळ भरतीने संविधानाच्या कलम 340, 341, 342 कडे दुर्लक्ष करून सामाजिक न्याय तत्त्वाचा भंग केला जात आहे. सदर भरती बेकायदेशीरपणे संविधानाचे उल्लंघन करून होत असून, समाजातील वंचित घटकावर अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.


जिल्हा बँक हा शासनाचा उपक्रम आहे. त्यामुळे बँकेला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग यांच्याकरिता त्यांच्या सेवकांमध्ये 52 टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे.जिल्हा बँकेचे सेवक भरतीचे जे नियम सहकार खात्याकडून मंजूर करून घेतलेले आहेत, त्यात राखीव जागेची तरतूद आहे. या नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नसताना जिल्हा बँक यांनी आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्याचा घाट घातला असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आला आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या नव्याने जाहीर केलेल्या भरतीमध्ये आरक्षणाची तरतूद रद्द करण्यात आलेली असून, बँकेकडे पाठपुरावा करून देखील कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. बँक प्रशासनकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील कुठलाही खुलासा आणि कुठलीही चर्चा न केल्याने आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आल्याचे म्हंटले आहे.

जिल्हा बँकेचे चेअरमन कर्डिले यांच्या निवासस्थानी भेटीचे आमंत्रण नाकारले; ठोस आश्‍वासन मिळे पर्यंत बेमुदत धरणे सुरु ठेवण्याचा निर्धार
आंदोलन स्थळी जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन सिताराम गायकर व संचालक माधवराव कानवडे यांनी आंदोलकांशी चर्चा करुन जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी यासंदर्भात चर्चेचे आमंत्रण दिले. मात्र आंदोलकांनी त्यांचे आमंत्रण नाकारुन आंदोलन सुरु ठेवले. तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आणि सहाय्यक निबंधक गणेश औटी यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र आरक्षणाच्या तरतुदीप्रमाणे जिल्हा सहकारी बँकेत भरती प्रक्रिया राबविण्याचे ठोस आश्‍वासन मिळत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे बेमुदत धरणे चालू राहणार असून, प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *