• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

राज्यात काळी आई ओलाशय सेवा योजना सुरु करावी

ByMirror

Jan 9, 2025
पीपल्स हेल्पलाइनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पीपल्स हेल्पलाइनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

दुष्काळ, पाणीटंचाई आणि जागतिक तापमान वाढीवर मात करणारा प्रयोग

नगर (प्रतिनिधी)- दुष्काळ, पाणीटंचाई आणि जागतिक तापमान वाढीच्या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यात काळी आई ओलाशय सेवा योजना सुरु करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती संघटनेचे ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
राज्य सरकारने संपूर्ण राज्यभर रेन गेन बॅटरीचा वापर शेतकऱ्यांच्या हितासाठी करण्याची गरज आहे. त्यामुळे निसर्ग धनराई मोठ्या प्रमाणात निर्माण होवू शकणार असून, शेतकऱ्यांना मोठे आर्थिक उत्पन्न देखील मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


रेन गेन बॅटरीमुळे झाडाच्या मुळांना वर्षभर ओलावा उपलब्ध होऊ शकतो. गुरुत्वाकर्षण बल आणि केशवाहिनी बल याचा वापर या तंत्रात केला जातो. प्रत्येक दोन एकर जमिनीमध्ये उताराच्या बाजूला समतल आडवा 20 फुट लांब, 5 फूट रुंद आणि 8 फूट खोल खड्डा करून त्यामध्ये दगड गोटे टाकून वरच्या बाजूला जाड मुरूम पसरवून खड्डा जमिनीच्या पातळीला भरायचा. पावसाळ्यात वाहून येणारे पाणी या खड्ड्यात सोडले तर वाहून जाणारे पाणी पूर्णपणे वाचते आणि बाष्पीभवन पूर्णपणे थांबते. त्यामुळे जमिनी खालून मुरलेले पाणी सर्वत्र पसरते आणि त्यातून फळबागांसाठी वर्षभर ओल टिकून राहत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


विशेष म्हणजे शेतातील विहीर, बोरवेलला सुद्धा पाणी वाढते. उन्हाळ्याच्या दिवसात ठिबक पद्धतीने थोडे पाणी दिले, तरी फळबाग जगतात. महाराष्ट्रातील जिरायत शेतकऱ्यांच्या जमिनी हंगामी बागायती यामुळे होऊ शकणार आहेत. त्याच वेळेला पाणी टंचाई कायमची संपवता येणार असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
आजपर्यंत जलसंधारण ज्या पद्धतीने केले जात होते, त्यापेक्षा ओलाशय योजना पूर्णपणे वेगळी आणि महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांसह तमाम महाराष्ट्रातील जनतेने अशा ओलाशय सेवा योजनेत सहभागी होणे आवश्‍यक आहे. पिकांचे किंवा फळबागांच्या मुळांना किमान ओलावा वर्षभर राहू शकणार आहे. खरीप आणि रब्बी पिकांना पावसाने ओढ दिली तरी रेन गेन बॅटरीमुळे पिकांच्या काळामध्ये सतत ओलावा टिकून राहणार आहे आणि कोणतेही पिक पावसाअभावी जळणार नाही. नगर जिल्ह्यातील ही सेवा योजना पीपल्स हेल्पलाइन शेतकऱ्यांच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे. ज्ञानेश्‍वर माऊलींच्या जलाशय निर्मावी, महावने लावावी! या ओवीची अंमलबजावणी संघटनेने सुरु केलेली आहे. दुष्काळ आणि पाणीटंचाई यापुढे महाराष्ट्राला भेडसावणार नाही अशी खात्री संघटनेने दिली असून, रेन गेन बॅटरीचा समावेश असलेल्या काळी आई ओलाशय सेवा योजना सुरु करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *