दरवर्षी भाऊबीज ही वृक्षबीज म्हणून साजरी करणार -शिवाजी पालवे
पर्यावरणाला बहीण मानून, त्याच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धनाची अभियान राबविणाऱ्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने भाऊबीज वृक्षारोपणाने व रोपांच्या वाटपाने साजरी करण्यात आली. नगर तालुक्यातील जखणगाव येथे ग्रामस्थांना भाऊबीजेला 110 रोपांची भेट देऊन पर्यावरणाला बहीण मानून, त्याच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारण्याचे आवाहन करण्यात आले.
या अभियानाप्रसंगी जखणगाव गावचे सरपंच डॉ. सुनिल गंधे, चेअरमन ॲड. बाळासाहेब कर्डिले, रमेश आंग्रे, पोलिस पाटील सुरेश कार्ले, आदर्श शिक्षक अब्बास शेख, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, महादेव शिरसाठ, सैनिक संघटना खातगावचे बशीर शेख, भगवानराव कोल्हे, किसन सातपुते, पोपट कुलट, गायकवाड मेजर आदी उपस्थित होते.

सरपंच डॉ. सुनिल गंधे म्हणाले की, जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी जय हिंदने घेतलेला पुढाकार दिशादर्शक आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करुन त्याचे संवर्धन करण्यात आले आहे. तर संघटनेच्या माध्यमातून माजी सैनिकांनी नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल निर्माण केलेली प्रेम व आस्था प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजी पालवे म्हणाले की, भाऊबीजेला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाऊ हा आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेत असतो. हे सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने ज्ञात आहे. असंच नातं वृक्ष व माणूस यांच्यात निर्माण व्हावे व पर्यावरणाला आपल्या बहिणीप्रमाणे महत्त्व देण्याचे आवाहन केले. तर यापुढे फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी भाऊबीज वृक्षबीज म्हणून साजरी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जखणगावातील ग्रामस्थांना आवळा, चिंच, आंबा, जांभूळ, करंज आदी झाडांचे वाटप करण्यात आले. आभार माजी सैनिक बशीर शेख यांनी मानले.
