लायन्स क्लब अहमदनगर व लिओ क्लबचा उपक्रम; 1 हजार मुलांचा राहणार समावेश
आर्थिक व विविध वस्तू स्वरूपात मदत करण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब अहमदनगर व लिओ क्लबच्या वतीने वंचितांच्या दिवाळीसाठी 9 नोव्हेंबर रोजी स्नेहालयात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमासाठी मराठी सिनेमा सृष्टीतील कलाकार उपस्थित राहणार आहेत. वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून त्यांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने आर्थिक तसेच विविध वस्तू स्वरूपात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे सोळावे वर्ष आहे.
या दीपोत्सव मेळाव्यात सहभागी होऊन वंचित घटकांना आनंद देण्यासाठी लायन्स क्लबच्या अध्यक्षा डॉ. अनघा पारगावकर, सचिव डॉ. सिमरनकौर वधवा, खजिनदार अंजली कुलकर्णी, लिओच्या अध्यक्षा रिधिमा गुंदेचा, प्रकल्प प्रमुख प्रशांत मुनोत, आनंद बोरा, सुनील छाजेड, समन्वयक हरजितसिंह वधवा, स्नेहालयाचे संचालक हनिफ शेख, कार्यक्रम समन्वयक महेश सूर्यवंशी नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
मागील सोळा वर्षांपासून लायन्स क्लबच्या माध्यमातून वंचित, अनाथ, दिव्यांग आणि निराधार मुलांची दिवाळी गोड होण्यासाठी दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी स्नेहालयासोबतच शहरातील इतर वंचित मुलांसाठी देखील हा कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यात मुलांसाठी मेहंदी, टॅटू, घोडागाडी राईड, जम्पिंग पॅड, मेरी गो राऊंड अशा विविध खेळांचा समावेश असणार आहे. तसेच पॉपकॉर्न, बुढ्ढी के बाल आणि मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुलांचे मनोरंजन करण्यासाठी विविध कार्टून पात्रांची देखील उपस्थिती राहणार आहे. तसेच मुलांच्या मनोरंजनासाठी व्हिक्टर डान्स अकॅडमी, गिरिराज जाधव यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम रंगणार आहे. मुलांसाठी विशेष होम मिनिस्टरच्या धर्तीवर चाइल्ड मिनिस्टरचा कार्यक्रम होणार आहे.
स्नेहालयाच्या परिसरात पणत्या प्रज्वलित करुन संपूर्ण परिसर दिव्यांनी लखलखाटणार आहे. कार्यक्रमादरम्यान मुलांना चॉकलेट आणि विविध खाऊंचे वाटप केले जाणार आहे. तर सोडत पध्दतीने विद्यार्थ्यांना विविध भेट वस्तूंचे बक्षीसे दिली जाणार आहेत. उडन तस्तरी हा प्रयोग देखील मुलांसाठी विशेष आकर्षण ठरेल. दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत कार्यक्रम रंगणार आहे.
दीपोत्सवाचे उद्घाटन प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी प्रांतपाल विजय सारडा, उप प्रांतपाल राजेश अगरवाल, रिजन चेअरमन आशिष बोरावके, डॉ. एस.एस. दीपक, शरद मुनोत, मोहनशेठ मानधना, लायन सचिन भट्टड, बाबुसेठ बोरा यांच्यासह प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन आणि फराळ वाटप करून करण्यात येईल. मुलांसाठी किल्ला बनवा, भेटकार्ड बनवा आणि निबंध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
वंचितांच्या दीपोत्सवासाठी तब्बल 5 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या वर्षी मुलांना नवीन कपडे देण्याचा मानस आहे. आपली दिवाळी आनंदी करताना, वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी सर्वांनी या उपक्रमात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदाच्या दीपोत्सवात एक हजारहून अधिक वंचित मुलांच्या सहभागाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने या उपक्रमासाठी वस्तूरूपात तसेच आर्थिक मदत स्वीकारली जाणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरविंद पारगावकर, धनंजय भंडारे, दिलीप कुलकर्णी, राजवीरसिंह संधू, अभय मेस्त्री, विजय कुलकर्णी, डॉ. अमित बडवे, डॉ. संजय असणानी, सुनील छाजेड, कमलेश भंडारी, सुमित लोढा, किरण भंडारी, संतोष माणकेश्वर, नितीन मुनोत, ऋषी सुकाळे, अर्पिता शिंगवी, अजित शिंगवी, प्रशांत गाडेकर, जस्मीत वधवा, आदींसह लायन्स व लिओ क्लबचे सदस्य परिश्रम घेत आहेत. अधिक माहितीसाठी डॉ. अनघा पारगावकर 9850885292, डॉ. सिमरनकौर वधवा 9422081761, अंजली कुलकर्णी 9422080676, प्रशांत मुनोत – 9422229699 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.