• Wed. Feb 25th, 2026

राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या संचालकांवर एनपीडी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा

ByMirror

Jul 17, 2024

अन्याय निवारण सेवा समितीचे सोमवारी सहकार आयुक्त कार्यालया समोर उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नसल्याने पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्यासह सर्व संचालक मंडळावर एनपीडी अंतर्गत गुन्हा दाखल करावा व जिल्हा लेखा परीक्षण अहवालानुसार सर्व संचालक मंडळावर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणी अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी सोमवारी (दि. 22 जुलै) सहकार आयुक्त कार्यालया (पुणे) समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.


कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनला 3 एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला असून, यामधील मुख्य आरोपी पोपट ढवळे, आझाद ठुबे व संभाजी भालेकर यांना अद्यापि अटक करण्यात आलेली नाही. या पतसंस्थेत अपहाराची व्याप्ती मोठी असून, यामध्ये अनेक ठेवीदारांच्या कोट्यावधीच्या ठेवी अडकल्या आहेत.


या पतसंस्थेत सहकार अधिनियमांचे उल्लंघन करून अनियमितता करण्यात आली आहे. पतसंस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात अपहार केला आहे. जिल्हा लेखा परीक्षण अहवालानुसार सर्व संचालक मंडळावर तात्काळ कारवाई होणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य व्यक्तींनी आपल्या जीवनाची पुंजी पतसंस्थेत ठेव म्हणून ठेवली होती. गेल्या दीड वर्षापासून हेलपाटे मारून देखील ठेवीदारांना ठेवी मिळालेल्या नाहीत. अनेक ठेवीदारांच्या ठेवींची मुदत संपून देखील ठेवी मिळत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पैश्‍याची अडचण असलेल्या काही ठेवीदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी संचालक मंडळावर कठोर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *