• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलच्या पालक शिक्षक सहविचार सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Jul 10, 2024
लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलच्या पालक शिक्षक सहविचार सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुलांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन

स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांमधील कला-कौशल्य विकसीत करावे -दादाभाऊ कळमकर

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धेत टिकण्यासाठी पारंपारिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमधील कला-कौशल्य विकसीत करावे लागणार आहे. पालक व शिक्षकांनी मुलांमधील वेगवेगळ्या क्षमता, कलागुण व कौशल्य ओळखून त्या दृष्टीकोनाने त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सुरुवात ही कष्टाने करावी लागते, कष्टाशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही. मुलांनी स्वतःचे काम स्वतः केले पाहिजे. पालकांनी मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करुन त्यांचे मार्गदर्शक झाल्यास त्या मुलांचे भवितव्य उज्वल असल्याची भावना रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांनी व्यक्त केली.


शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाची पालक शिक्षक सहविचार सभेत मार्गदर्शन करताना कळमकर बोलत होते. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सभेसाठी नवनाथ बोडखे, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडूळे, जनरल बॉडी सदस्य अभिषेक कळमकर, अर्जुन पोकळे, श्‍याम व्यवहारे, कैलास गुंजाळ, जयद्रथ खाकाळ, अंबादास गारुडकर, तुषार साठे, प्राथमिक विदयालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे आदींसह शालेय शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी पालक-शिक्षकांमधील विद्यार्थी हा दुवा आहे. विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक व पालकांमध्ये समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी पालक शिक्षक संघ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अभिषेक कळमकर म्हणाले की, स्पर्धेच्या युगात अवांतर वाचनावर विद्यार्थ्यानी भर द्यावा. वाचनाने मन एकाग्र व बुध्दी प्रगल्भ होते. आपला मुलगा ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्ग शिक्षिकाची पालकांनी संवाद साधणे आवश्‍यक असून, मुलांमधील उणीवा लक्षात घेऊन त्या दृष्टीने त्याला मार्गदर्शन देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


ज्ञानदेव पांडूळे म्हणाले की, या विद्यालयात सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेऊन आपली गुणवत्ता सिध्द करत आहे. फास्टफुडच्या युगात मुलांना डब्यामध्ये पौष्टिक आहार देण्याची गरज. बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास देखील महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. अर्जुन पोकळे यांनी कुटुंब विभक्त होत गेल्याने संस्काराची गरज भासत आहे. पालक व शिक्षकांनी योग्य भूमिका पार पाडल्यास संस्कारी पिढी घडणार असल्याचे सांगितले.

नवनाथ बोडखे म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बदलले असून, विद्यार्थ्यांपुढे नवीन आव्हाने व संधी निर्माण झाली आहेत. मुलांसह पालक देखील डिजीटल साक्षर होणे गरजेचे आहे. मुलांना खरे संस्कार व शिक्षणाची आवड निर्माण करणारी आई असते. गुणांच्या बेरजेत मुलांची गुणवत्ता ठरवू नये. प्रज्ञाचा शोध घेऊन मुलांचा विकास साधण्याचे त्यांनी आवाहन केले.
या पालक शिक्षक सहविचार सभेत शाळेसंबंधी विविध प्रश्‍न, समस्या व शैक्षणिक उपक्रमाबद्दल चर्चा करण्यात आली. शिक्षक-पालक संघासाठी सर्व वर्गातील प्रतिनिधींची निवड या मेळाव्यात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पालवे व सुजाता दोमल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंखे, अमित धामणे यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *