• Sun. Apr 19th, 2026

मंथन परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचे 124 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

ByMirror

Apr 17, 2026

ओजस्वी भोरे व आयुष गंभीरे राज्यात द्वितीय, तर आस्था सुंबे पाचव्या स्थानी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्था संचलित कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेने राज्यस्तरीय मंथन परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटवली आहे. शाळेतील तब्बल 124 विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवरील गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे.


यामध्ये 3 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत, 32 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत, तर 89 विद्यार्थ्यांनी केंद्र गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत इयत्ता दुसरीतील ओजस्वी स्वप्निल भोरे व आयुष योगेश गंभीरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच इयत्ता चौथीतील आस्था निलेश सुंबे हिने राज्यात पाचवा क्रमांक पटकावत शाळेचा गौरव वाढविला आहे.


या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा स्कूल कमिटी सदस्य अर्जुनराव पोकळे व संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांच्या हस्ते शाळेत विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहविभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे, संस्थेचे लाइफ मेंबर सदस्य शिवाजीराव लंके, प्राचार्य छायाताई काकडे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर यांच्यासह पालक संघ व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.


विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका मीनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, शितल रोहकले, जयश्री खांदोडे, सोनाली अनुभुले, रूपाली वाबळे, भाग्यश्री लोंढे, भारती सुसरे, इंदुमती दरेकर, कांचन मदने, पुनम धाडगे व रूपाली पांडुळे यांनी मार्गदर्शन करुन परीक्षेची तयारी करुन घेतली होती. या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *